Advertisement

🌿 सावली वनपरिक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा 🌿

🌿 सावली वनपरिक्षेत्रात


वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा 🌿

सावली (प्रतिनिधी) :
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत सावली वनपरिक्षेत्रात वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात आणि जनसहभागातून साजरा करण्यात आला. वन्यजीवांचे पर्यावरणातील तसेच मानवी जीवनातील अनमोल योगदान अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन व संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.


सावली वनपरिक्षेत्रातील सावली, व्याहाड, राजोली, पाथरी आणि पेंढरी या उपवनक्षेत्रांतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळांमधून जनजागृती रॅली काढून विद्यार्थ्यांना वन्यजीवांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा यांचेही आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

तळागाळापर्यंत वन्यजीव संवर्धनाचा संदेश पोहोचावा यासाठी गावागावात कलापथकांद्वारे प्रभावी जनजागृती कार्यक्रम सादर करण्यात आले. याशिवाय, जंगल परिसरात नैसर्गिक पुनर्निर्मितीची कामे, वनराई बंधाऱ्यांची निर्मिती तसेच सार्वजनिक ठिकाणी वन्यजीवांचे महत्त्व सांगणारे पोस्टर्स आणि भित्तीपत्रके लावण्यात आले. या सर्व उपक्रमांमुळे ग्रामीण जनतेमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढविण्यास हातभार लागला.

वन्यजीव हे पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्या अस्तित्वाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत सावली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले. त्यांनी पुढे सांगितले की, "मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. संवेदनशील आणि जबाबदार वृत्ती ठेवून आपण सर्वांनी वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे."

या आठवडाभर चाललेल्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला असून, वन्यजीव संरक्षणाच्या चळवळीला स्थानिक पातळीवर अधिक गती मिळाली आहे.

✍️ विनोद धुर्वे
वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या