MIDC प्रकल्पाविरुद्ध शेतकऱ्यांचा एल्गार — 14 गावांच्या भवितव्यावर काळे ढग!
भेंडाळा परिसरातील जनतेत प्रचंड असंतोष — शेतकऱ्यांनी घेतला एकजुटीचा निर्धार!
चामोर्शी (तालुका प्रतिनिधी - सुखसागर झाडे)
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांच्या शेतकऱ्यांच्या उपजत जमिनींवर शासनाकडून MIDC प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. महसूल विभागाला शासनस्तरावरून देण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, संबंधित गावांमध्ये नोटिसा सार्वजनिक स्थळी प्रसिद्ध करण्यात येताच शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
शेतकऱ्यांचा आरोप आहे की, शासन औद्योगिक विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यासाठी कुटनिती षडयंत्र रचत आहे. मागील ३० वर्षांपासून भोगवट क्रमांक २ मधून भोग. १ मध्ये परावर्तित करण्यात आलेल्या जमिनींच्या नोंदींची तपासणी करण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांच्या आदेशानुसार महसूल विभागीय समिती गठीत करण्यात आली असून, ६ ऑक्टोबर २०२५ पासून तिचे कार्य सुरू झाले आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फोकुर्डी येथून शेतकरी बैठकींची मालिका सुरू झाली असून, मोहर्ली, वेलतुर, रिठ इत्यादी गावांमध्ये जनचर्चा आणि सल्लामसलत सुरू आहेत. बैठकींमध्ये शेतकऱ्यांनी आपले मनोगत स्पष्टपणे मांडत MIDC प्रकल्पास ठाम विरोध दर्शविला. "शेती ही आमची आई आहे; तिचे रक्षण आमचे कर्तव्य आहे," असे ठाम शब्दांत शेतकऱ्यांनी प्रतिपादन केले.
सभांमध्ये चामोर्शी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद भगत (मौजा घारगाव) यांनी उपस्थितांना संबोधित करत, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस सदैव अग्रभागी राहील. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा कुठलाही प्रयत्न सहन केला जाणार नाही,” असा इशारा दिला.
प्रत्येक गावातील प्रथम नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, तसेच परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने या बैठकींना उपस्थित होते. बैठकींच्या माध्यमातून पुढील आंदोलनाची दिशा व रणनीती ठरविण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आले.
भेंडाळा परिसरातील शेतकरी एकदिलाने म्हणत आहेत —
“आमच्या जमिनी आमचा जीव आहेत; विकासाच्या नावाखाली आमचा जीव गेला तरी चालणार नाही, पण जमीन देणार नाही!”
शासनाने तातडीने या आंदोलनात्मक वातावरणाची दखल घेत शेतकऱ्यांशी संवाद साधावा, अन्यथा पुढील काळात मोठा जनआक्रोश उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
📍 भेंडाळा परिसर – चामोर्शी तालुका, जि. गडचिरोली
✍️ वार्ताहर – सुखसागर झाडे

 



 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
0 टिप्पण्या
Thanks for reading