नांदगाव दारू भट्टी प्रस्ताव वादात!
ग्रामसभा रद्द; पैशांची ऑफर, पार्टीबाजी आणि राजकीय हस्तक्षेपाचे आरोप
(जिवनदास गेडाम, ता. मूल, जि. चंद्रपूर):
नांदगाव येथे देशी दारू दुकान (दारू भट्टी) सुरू करण्याच्या प्रस्तावामुळे गावातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून, या विषयावर चर्चा करण्यासाठी दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा अखेर रद्द करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने अधिकृत जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे.
दिनांक २३/१२/२०२५ रोजी ग्रामसभेची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या विषयावर पारित झालेल्या ठरावास मा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती मूल यांनी तात्काळ स्थगिती आदेश दिला असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत सचिव व ग्रामविकास अधिकारी यांनीही सतर्कता पत्रक जारी केले आहे.
पैशांची ऑफर व पार्टीबाजीचे गंभीर आरोप
दारू भट्टी सुरू करण्यासाठी गावात प्रचंड चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ठराव आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रत्येक मतदाराला एक हजार रुपये देण्याची ऑफर, तसेच महिला व पुरुषांसाठी जेवण पार्टी दिली जात असल्याचे प्रकार घडले आहेत.
इतकेच नव्हे तर, दोन्ही गटांकडून गावात कोंबडा पार्टी व बकरा पार्टीचा सपाटा सुरू असल्याचेही ग्रामस्थ सांगत आहेत. या प्रकारांमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
राजकीय मोठ्या नेत्याच्या हस्तक्षेपाची चर्चा
दारू भट्टी गावात होऊ नये, यासाठी एका राजकीय मोठ्या नेत्याचा थेट हस्तक्षेप सुरू असल्याची चर्चा नांदगावमध्ये रंगली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सदर नेत्याकडूनही मतदारांना आपल्या बाजूने ठेवण्यासाठी प्रयत्नांचा सपाटा सुरू असून, यामुळे संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.
रस्ते बांधण्याचे आमिष?
नवीन दारू दुकान सुरू करू पाहणारा व्यक्ती गावातील रस्ते तयार करून दाखवतो, अशी माहितीही ग्रामस्थांकडून दिली जात आहे. दारू भट्टीच्या बदल्यात विकासकामांचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप होत असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम व रोष वाढला आहे.
सरपंच व पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय
ग्रामसभेतील मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे व अन्य आमिषे दिली जात असल्याचे आरोप समोर येत असताना,
“मग ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकाऱ्यांना किती ‘हात धुतले’ असतील?”
हा प्रश्न आता उघडपणे चर्चेत आला आहे.
ही बाब थेट आरोप नसून चौकशी व संशोधनाचा विषय असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र संपूर्ण प्रक्रियेत पदाधिकाऱ्यांची भूमिका काय होती, ठराव पारित करण्यासाठी दबावतंत्र वापरण्यात आले का, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पुढील आदेशापर्यंत सर्व कार्यवाही स्थगित
प्रशासकीय आदेशांचा मान राखून, दिनांक २३/१२/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली ग्रामसभा नोटीस रद्द करण्यात आली असून, नियोजित ग्रामसभा दि. ३१/१२/२०२५ रोजी होणार नाही, असे ग्रामपंचायत प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुढील आदेश येईपर्यंत या विषयावर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही.
चौकशीकडे गावाचे लक्ष
दारू भट्टी नांदगाव येथे सुरू होणार की कायमस्वरूपी रोखली जाणार, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या चौकशीनंतरच या प्रकरणावर अंतिम निर्णय होणार असून, तोपर्यंत नांदगावमध्ये संशय, राजकीय हस्तक्षेप आणि तणावाचे वातावरण कायम आहे.




0 टिप्पण्या
Thanks for reading