आपसी सहमतीने शेतरस्ते मोकळे करण्याचा आदर्श उपक्रम – तहसील कार्यालय पोंभुर्णा यांचे आवाहन
पोंभुर्णा | प्रतिनिधी (दरारा 24 तास न्यूज नेटवर्क)
पोंभुर्णा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीच्या वहिवाटीसाठी असलेले पारंपरिक पांदण व शेतरस्ते गैरसमज, सीमावाद किंवा संवादाच्या अभावामुळे अडवले जात असल्याची बाब निदर्शनास येत आहे. शेतरस्ते अडवल्याने संबंधित शेतकऱ्यांना शेतीकाम, पीक वाहतूक, दैनंदिन व्यवहार तसेच आपत्कालीन सेवांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी गावातील सामाजिक सलोखा, परस्पर विश्वास व एकोप्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 143 तसेच मामलेदार कोर्ट अॅक्ट 1906 नुसार अडवलेला रस्ता मोकळा करून देणे अथवा आवश्यकतेनुसार नवीन रस्ता देण्याचा अधिकार तहसीलदार यांना आहे. मात्र, अशा स्वरूपाची प्रकरणे तहसीलदारांच्या न्यायालयात दाखल झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू होते आणि त्यातून संबंधित पक्षांमधील वाद अधिक तीव्र होण्याची, तसेच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर मौजे चक हत्तीबोडी येथे मंडळ अधिकारी श्री. चिडे व ग्राम महसूल अधिकारी श्रीमती आरती धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमित पांदण रस्ता शेतकऱ्यांनी आपसी संवाद व परस्पर सहमतीने मोकळा करून दिल्याचा आदर्श उपक्रम नुकताच यशस्वीपणे राबविण्यात आला. कोणतीही कायदेशीर कारवाई न करता, ग्रामस्थांनी परस्पर विश्वास ठेवून सामंजस्याने निर्णय घेतल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला असून गावातील शांतता, सलोखा व सामाजिक एकोपा अधिक दृढ झाला आहे. हा उपक्रम तालुक्यातील इतर गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.
गावातील शांतता, सामाजिक सलोखा व परस्पर सहकार्य अबाधित राखण्यासाठी शेतरस्त्यांचे प्रश्न हे प्रथम आपसी समजुतीने व संवादाच्या माध्यमातून सोडविणे हे सर्वांच्या हिताचे असल्याचे तहसील कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पारंपरिक वहिवाटीचे रस्ते मोकळे ठेवणे, शेजारील शेतकऱ्यांच्या गरजांची जाणीव ठेवून परस्पर सहकार्य करणे ही ग्रामीण संस्कृतीची ओळख असून ती जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींना आवाहन करण्यात येते की, शेतरस्त्यांबाबत कोणताही वाद उद्भवल्यास प्रथम ग्रामपातळीवर चर्चा, संवाद व सामंजस्याच्या माध्यमातून तोडगा काढावा. आपसी सहमतीने रस्ते मोकळे केल्यास तहसील कार्यालयामार्फत न्यायालयीन कार्यवाही करण्याची गरज भासणार नाही तसेच अनावश्यक वाद, वेळ व खर्च टाळता येईल.
सामाजिक तणाव निर्माण होण्यापेक्षा गावाचा विकास, शेतकऱ्यांचे हित व परस्पर विश्वास यांना प्राधान्य देत एकोप्याने शेतरस्त्यांचे प्रश्न सोडवावेत, असे आवाहन तहसील कार्यालय, पोंभुर्णा यांच्या वतीने करण्यात आले आहे.




0 टिप्पण्या
Thanks for reading