अवैध गोवंश वाहतुकीप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल-
दोन चारचाकी वाहनांसह ८.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त; उमरी पोतदार पोलिसांची धडक कारवाई
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी
पोंभूर्णा (चंद्रपूर):
पोंभूर्णा तालुक्यातून चंद्रपूरकडे गोवंशाची अमानुष व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या सहा जणांवर उमरी पोतदार पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन टाटा एस चारचाकी वाहनांसह एकूण ८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाहनांतून १४ गोवंश जनावरे अमानुषरीत्या कोंबून वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.
उमरी पोतदार पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, पोंभूर्णा येथून चंद्रपूरकडे दोन टाटा एस वाहनांतून गोवंशाची अवैध वाहतूक सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ पथक तयार करून संबंधित मार्गावर नाकाबंदी केली. काही वेळात संशयित दोन चारचाकी वाहने घटनास्थळी येताना दिसताच पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा दिला.
वाहने थांबवून तपासणी केली असता, दोन्ही वाहनांत १४ गोवंश जनावरे अत्यंत अमानुष पद्धतीने बांधून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनचालकांकडे जनावरांच्या वाहतुकीसंबंधी आवश्यक परवाने व कागदपत्रांची मागणी केली असता, कोणतेही वैध कागदपत्र सादर करता आले नाहीत.
यानंतर पोलिसांनी कारवाई करत आसीफ हुसेन फारुख शेख (३८), शेख इमाम शेख मेहबूब (४७), सैयद मो. राज मो. (४७), अजय विजय बुरचुंडे (२७), शेख इसराइल शेख अब्दुल (३८) आणि शेख सुलतान शेख हुसेन (१८) (सर्व रा. विविध ठिकाणे) या सहा आरोपींविरुद्ध उमरी पोतदार पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ०१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय प्राण्यांना क्रूरपणे वागणुकीचा प्रतिबंध अधिनियम १९६० मधील कलम ११ (१) (घ), (ड), (च), (ज) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील १४ गोवंश जनावरे (अंदाजे किंमत १६ हजार रुपये) तसेच दोन टाटा एस चारचाकी वाहने (अंदाजे किंमत ८ लाख रुपये) असा एकूण ८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे व उमरी पोतदार पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या केली. या प्रकरणाचा पुढील तपास उमरी पोतदार पोलीस करीत आहेत.




0 टिप्पण्या
Thanks for reading