👇
नांदगावात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३ वर्षांच्या चिमुकल्यासह १० ते १२ जण जखमी-
ग्रामपंचायत व प्रशासनाची उदासीनता; काँग्रेस नेते विनोद अहिरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीची मागणी
नांदगाव (ता. मूल, जि. चंद्रपूर) | प्रतिनिधी – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
मौजा नांदगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत अवघ्या ३ वर्षांच्या चिमुकल्या गणेश विनोद मांदाडे याच्यासह १० ते १२ नागरिक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी (शुक्रवार) श्री. विनोद ईश्वर मांदाडे यांचा मुलगा कु. गणेश विनोद मांदाडे (वय ३ वर्षे) हा आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्या मानेवर चावा घेतला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतरही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही.
दरम्यान, दि. ०९ जानेवारी २०२६ रोजी आठवडी बाजाराच्या दिवशी याच पिसाळलेल्या कुत्र्याने बाजारात आलेल्या १० ते १२ नागरिकांवर हल्ला करून त्यांना चावा घेतला, यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. बाजारपेठ, रस्ते व वस्तीत मुक्त संचार करणाऱ्या या कुत्र्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायत नांदगाव व स्थानिक प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे जखमी चिमुकल्याला किंवा इतर बाधित नागरिकांना कोणतीही शासकीय मदत अथवा तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरविण्यात आलेली नाही.
या गंभीर घटनेची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी – ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विनोद गजानन अहिरकर यांनी दखल घेत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करावा तसेच जखमी नागरिकांना योग्य उपचार व मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गावात लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.
आता जिल्हा प्रशासन या प्रकरणात कोणती ठोस पावले उचलते, याकडे नांदगावसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.





0 टिप्पण्या
Thanks for reading