मोखाळ्यातील देशी दारू दुकान नांदगावात स्थानांतरित करण्यासाठी हालचाली-
न्यायप्रविष्ट प्रकरण असताना सरपंच–सचिवांची ग्रामसभा घेण्याची लगीनघाई
नांदगाव | प्रतिनिधी
मोखाळा येथील देशी दारूचे दुकान नांदगाव येथे स्थानांतरित करण्यासाठी जोरदार खटाटोप सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. विशेष म्हणजे या दुकानासंदर्भातील प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असताना नांदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेण्यासाठी लगीनघाई करत असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दुकानासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या जागेसंदर्भातील भाडेपट्टी करारनामा देखील संशयास्पद असल्याचा आरोप असून, याबाबत वेळोवेळी संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घ्यावा व शासकीय नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायतीकडून ग्रामसभेत देशी दारूच्या दुकानास मंजुरी देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.
डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा याच कारणावरून रद्द करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा १९ जानेवारी रोजी केवळ याच देशी दारू दुकानाच्या परवानगीचा विषय घेऊन ग्रामसभा बोलावण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सदर देशी दारूचे दुकान दिलीप मोटवानी यांच्या मालकीचे असून मे. प्रथमेश कार्पोरेट या नावाने सीएल-२ अनुज्ञप्ती अंतर्गत कार्यरत होते. दिनांक १६ जून २०२१ च्या पत्रानुसार हे दुकान मोखाळा येथे सन २०१४ पर्यंत सुरू होते. सन २०२१–२२ मध्ये सीएल-३ अनुज्ञप्ती नूतनीकरणासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालात दुकान सुरू करण्यास तत्त्वतः हरकत नसल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र कागदपत्रांतील त्रुटी आणि विलंब शुल्क भरण्याबाबत स्पष्ट सूचना करण्यात आल्या होत्या.
या प्रकरणात विलंब व त्रुटींमुळे मोटवानी यांनी न्यायालयात धाव घेतली असून सदर प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे. असे असताना नांदगाव ग्रामपंचायतीकडे दुकान स्थानांतराची मागणी करण्यात येत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे न्यायप्रविष्ट प्रकरण असताना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नसतानाही मासिक सभा व ग्रामसभेच्या अजेंड्यावर नाहरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे सरपंच व सचिवांची भूमिका संशयास्पद असल्याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.
दारू दुकानाच्या परवानगीसाठी होत असलेल्या या हालचालींमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त केली जात असून, न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतीही कार्यवाही करू नये, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
👉




0 टिप्पण्या
Thanks for reading