— दरारा 24 तास
एकोणवीस जानेवारीच्या ग्रामसभेकडे नांदगावकरांचे लक्ष-
दारू दुकान परवानगीचा मुद्दा केंद्रस्थानी; ग्रामसभेत कोणाच्या बाजूने ठराव होणार याची उत्सुकता
नांदगाव (ता. मुल, जि. चंद्रपूर) | प्रतिनिधी
नांदगाव येथे येत्या 19 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे. या ग्रामसभेत दारू दुकानाच्या परवानगीसंदर्भातील ठराव मांडला जाणार असल्याची चर्चा गावात सुरू असून, या मुद्द्यावर ग्रामसभा कोणता निर्णय घेते याबाबत नांदगाववासीयांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
ग्रामसभेचा मुख्य अजेंडा दारू दुकानास परवानगी देण्याचा असल्याचे बोलले जात असून, यामुळे ग्रामसभेपूर्वीच गावात जोरदार चर्चा, मतमतांतरे आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. काही नागरिक दारू दुकानामुळे महसूल वाढ, रोजगार निर्मिती व सोयीचा मुद्दा मांडत असताना, दुसरीकडे अनेक ग्रामस्थ, महिला व सामाजिक कार्यकर्ते दारूमुळे सामाजिक प्रश्न, कौटुंबिक वाद, गुन्हेगारी व आरोग्याच्या समस्या वाढतील अशी भीती व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे, गावातील पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा, विकासकामे प्रलंबित असताना दारू दुकानासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप काही नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार, दारू दुकानाच्या परवानगीसाठी ग्रामसभेचा ठराव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ग्रामसभेत बहुमताने जो ठराव मंजूर होईल, त्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळेच ही ग्रामसभा नांदगावच्या सामाजिक भवितव्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, ग्रामसभेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले मत मांडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
आता सर्वांचे लक्ष 19 जानेवारीच्या ग्रामसभेकडे लागले असून, दारू दुकानाच्या बाजूने ठराव मंजूर होतो की विरोधात, यावर नांदगावच्या पुढील वाटचालीची दिशा ठरणार आहे.




0 टिप्पण्या
Thanks for reading