Advertisement

नांदगावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत- अनेकांना चावा; भीतीचे वातावरण, नागरिक रस्त्यावर उतरले

दरारा चोवीस तास न्यूज नेटवर्क


नांदगावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत-

अनेकांना चावा; भीतीचे वातावरण, नागरिक रस्त्यावर उतरले

नांदगाव (प्रतिनिधी / जीवनदास गेडाम)
मुल पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या नांदगाव गावात पिसाळलेल्या कुत्र्याने गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक नागरिकांना चावा घेतल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत लहान मुले, महिला तसेच वृद्ध नागरिक जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ले करत गावातील गल्लीबोळ, मुख्य रस्ते व शेतवस्ती परिसरात दहशत पसरवली. अचानक हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दिवसा देखील घराबाहेर पडण्यास नागरिक धजावत नाहीत. विशेषतः शाळेत जाणारी मुले व कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे.

गावात कुत्र्यांचा त्रास वाढत चालल्याने संतप्त नागरिकांनी अखेर स्वतःच पुढाकार घेत लाठ्या-काठ्या घेऊन दिवस-रात्र जागून पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त केला. मात्र त्यानंतरही गावात आणखी काही कुत्रे संशयास्पद हालचाली करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले असून, भविष्यात पुन्हा अशीच घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जखमी नागरिकांना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी मुल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींना रेबीज प्रतिबंधक लस (Anti-Rabies Vaccine) देण्यात आली आहे. मात्र आरोग्य यंत्रणेची तत्काळ आणि प्रभावी कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाने तातडीने लक्ष देऊन पिसाळलेल्या तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, गावात औषध फवारणी करावी तसेच जखमी नागरिकांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नांदगावातील ही घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण असून, वेळेत ठोस पावले उचलली नाहीत तर एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या