जुनगाव येथे शिव जन्मोत्सव सोहळा २०२६ निमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जुनगाव (ता. पोंभुर्णा) येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव जन्मोत्सव सोहळा २०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त दिनांक १८ फेब्रुवारीला रात्री भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील नागरिक, युवक मंडळे व महिला मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.
या सोहळ्याचे उद्घाटन सरपंच राहुल भाऊ पाल यांच्या हस्ते करण्यात आले. सहउद्घाटक म्हणून विश्वेश्वर भाकरे (माजी उपसरपंच) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रफुल्ल चुदरी (तंटामुक्त समिती अध्यक्ष) होते. यावेळी रवी भाऊ घोटेकर, माजी सरपंच पत्रकार व जीवनदास गेडाम, पांडुरंग पाटील पाल, अंकुश जी गोहणे, बाळूजी पोरटे, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई मधुकर झाडे, संगीता झबाडे, बाबुराव चंदनखेडे, प्रमोद भाऊ चुदरी, खुशाल भोयर, गजानन पाटील पाल, प्रकाश भाऊ भाकरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, पोवाडे, नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिवचरित्रावर आधारित नाटिका आणि वक्तृत्व स्पर्धांमुळे वातावरण देशभक्तीने भारावून गेले.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य, न्यायनिष्ठा व स्वराज्य संकल्पनेवर प्रकाश टाकला. युवकांनी शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजकार्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक मंडळ, ग्रामस्थ व युवकांनी विशेष परिश्रम घेतले. जुनगाव येथे शिव जन्मोत्सव सोहळा २०२६ हा प्रेरणादायी आणि ऐतिहासिक ठरला.




0 टिप्पण्या
Thanks for reading