घोसरी गावातील पाटाचे काम निकृष्ट; चौकशीची मागणी
शेतरस्ता तातडीने उपलब्ध न झाल्यास आंदोलनाचा इशारा; तहसीलदारांना निवेदन
पोंभूर्णा, प्रतिनिधी : पोंभूर्णा तालुक्यातील घोसरी गावात पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आलेले पाटाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत संबंधित कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांसाठी तातडीने शेतरस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आकाश विलास वडपल्लीवार (युवा मोर्चा तालुका सचिव, ग्रामपंचायत सदस्य तथा तंटामुक्ती समिती अध्यक्ष, घोसरी) यांनी तहसीलदार, पोंभूर्णा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाटबंधारे विभागाच्या कामामुळे शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारा जुना मार्ग बंद झाला असून पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दररोज सुमारे पाच किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करून शेतात जावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असून शेतीची कामेही प्रभावित होत आहेत.
यासंदर्भात संबंधित अधिकारी व कंत्राटदारांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत स्वतंत्र चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी व शेतरस्ता तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, किशोर चौधरी (सामाजिक कार्यकर्ते), प्रज्वल निमगाडे (सामाजिक कार्यकर्ते), विनोद पुडके, अतुल पाल तसेच घोसरी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी या मागणीला पाठिंबा दर्शविला असून प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
एका आठवड्याच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन व उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रती माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर तसेच गटविकास अधिकारी, पोंभूर्णा यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
— जीवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी, चंद्रपूर





0 टिप्पण्या
Thanks for reading