*विद्युत तारांच्या स्पर्शाने शेतमजूर गंभीर जखमी*
*स्लॅबवरील कचरा व वेली काढताना झाला अपघात; उपचारासाठी चंद्रपूरला हलविले*
विजय जाधव
नांदगाव (मूल) प्रतिनिधी :
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील नांदगाव येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका शेतमजुराला विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का बसून तो गंभीर जखमी झाला. स्लॅबवर चढून विद्युत तारांवर गेलेल्या वेली तसेच साचलेला कचरा साफ करत असताना मुख्य वीजवाहिनीच्या संपर्कात आल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, रामदास तानुजी उमक (वय अंदाजे ६० वर्षे, रा. नांदगाव, ता. मूल, जि. चंद्रपूर) हे आपल्या घरावरील स्लॅबवर चढून विद्युत तारांमध्ये अडकलेल्या वेली आणि कचरा साफ करत होते. यावेळी स्लॅबलगतून गेलेल्या मुख्य वीजवाहिनीचा त्यांच्या शरीराला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना तीव्र विद्युत धक्का बसला आणि ते जोरात स्लॅबवर आपटले.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना सुरक्षित खाली उतरविले. त्यानंतर प्राथमिक उपचारासाठी स्थानिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.
या घटनेमुळे नांदगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, घरांच्या अगदी जवळून जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिन्या आणि त्यावर वाढलेल्या वेलींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा धोकादायक ठिकाणी कोणतेही काम करताना वीजपुरवठा खंडित करूनच काम करावे, तसेच महावितरणनेही अशा ठिकाणांची नियमित तपासणी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.




0 टिप्पण्या
Thanks for reading