४०.८४ कोटींच्या 'अमृत २.०' पाणीपुरवठा योजनेला मंजुरी; मात्र पोंभुर्णेकर पाच दिवसांपासून पाण्याविना त्रस्त
कोट्यवधींचा निधी मंजूर, पण वर्तमानातील पाणीटंचाई कायम; नागरिकांकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
पोंभुर्णा | प्रतिनिधी
पोंभुर्णा शहरातील पिण्याच्या पाण्याची दीर्घकालीन समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या 'अमृत २.०' अभियानांतर्गत नगरपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या ४०.८४ कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे. या योजनेमुळे भविष्यात शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी दुसरीकडे शहरातील नागरिकांना गेल्या पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याविना हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याने सद्यस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील अनेक भागांत गेल्या पाच दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा झालेला नसल्याचा नागरिकांचा दावा आहे. त्यामुळे महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असून, काहींना खासगी टँकर किंवा पर्यायी स्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे. वाढत्या उष्णतेत आणि दैनंदिन गरजांसाठी पाण्याचा तुटवडा नागरिकांसाठी गंभीर समस्या बनला आहे.
दरम्यान, दीर्घकालीन उपाय म्हणून मंजूर झालेली ४०.८४ कोटी रुपयांची 'अमृत २.०' पाणीपुरवठा योजना शहरासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या योजनेअंतर्गत जलस्रोतांचा विकास, जलशुद्धीकरण व्यवस्था, नवीन जलवाहिन्या, पाणी साठवण क्षमता वाढविणे आणि शहरातील प्रत्येक भागापर्यंत प्रभावी पाणीपुरवठा पोहोचविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.
या परिसरातील पाणीपुरवठा योजनांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत सातत्याने आढावा घेण्यात येत असून, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही विविध योजनांच्या प्रगतीचा पाठपुरावा केल्याची माहिती आहे.
मात्र नागरिकांचा सवाल असा आहे की, भविष्यातील योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होत असताना, आजच्या घडीला पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याविना नागरिकांना का राहावे लागत आहे? नवीन योजना प्रत्यक्षात पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने, तोपर्यंत विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवणे ही नगरपंचायतीची प्राथमिक जबाबदारी असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांनी नगरपंचायतीने तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, आवश्यक असल्यास टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि पाणीपुरवठा खंडित होण्यामागील कारणे जाहीर करून त्यावर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.




0 टिप्पण्या
Thanks for reading