जुनासुरला येथील देशी दारूचे दुकान बंद करा-
गावकऱ्यांची व आजी- माजी पदाधिकाऱ्यांची मागणी!
ग्रामसभा घेऊन निर्णय घेण्यासाठी दिले निवेदन
- मुल तालुका प्रतिनिधी
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
तालुक्यातील जुनासुरला या गावात सरकार मान्य देशी दारूचे दुकान आहे. मात्र हे दुकान सर्व नियमांना धाब्यावर बसवून गडचिरोली जिल्ह्यातही गुप्तपणे दारूची ठोकण विक्री करीत असल्याने व कमी किमतीतील दारू जादा किंमत आकारून विकत असल्याने तळीरामांना आर्थिक भुर्दंड सहन करून शौक पूर्ण करावा लागत आहे.
सदर दुकान जिल्हाधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या वेळेत उघडत व बंद होत नसून सकाळी साडे सात ते आठ आणि रात्री बारा वाजता बंद होते. त्यामुळे गावातील आरोग्यास व शाळकरी विद्यार्थ्यांस याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या दुकानाला फक्त किरकोळ दारू विक्री करण्याचा परवाना असताना सदर दुकानातून मोठ्या प्रमाणात ठोक दारू गडचिरोली जिल्ह्यात पाठवली जात असते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित करून सदर विषयावर चर्चा घडवून आणून हे दारू दुकान बंद करण्यासाठी ठराव पारित करावा अशी मागणी गावातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
एकंदरीत दोन दारू दुकानदारांच्या लढाईत ही बाब अवघड होत चालली आहे. यात दारू दुकानदारांचाच फायदा आहे आणि सामान्य नागरिकांची नुकसानच आहे. असेही मत काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे ग्रामसभा कोणता निर्णय देते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. निवेदन देताना सरपंच रंजीत भाऊ समर्थ, राजु भाऊ गोवर्धन उप सरपंच, खुशाल भाऊ टेकाम माजी उप सरपंच हे उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Thanks for reading