घोसरी बैल बाजारातून तेलंगणाकडे बैलांची अवैध तस्करी; दलालांचा गोरखधंदा बेधडक सुरू
पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील प्रसिद्ध बैल बाजार सध्या दलालांच्या ताब्यात गेला असून, येथून तेलंगणा राज्यातील कवठाळा बाजारात बैलांची अवैध रवानगी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या गोरखधंद्यात अनेक दलाल, बाजार समितीचे कर्मचारी, तसेच काही गोरक्षण समितीचे पदाधिकारी देखील सहभागी असल्याचा धक्कादायक आरोप उघड झाला आहे.
दलालांचा कब्जा – शेतकऱ्यांचा बाजार कि तस्करांचा?
पूर्वी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेला घोसरी बैल बाजार आता दलालांच्या विळख्यात सापडला आहे. हे दलाल प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून बैल खरेदी करून, त्यांची अवैध वाहतूक तेलंगणाच्या बाजारात करीत आहेत. यामध्ये ना कुठली अधिकृत नोंद, ना वैध परवाने – साऱ्या कायद्यांना धाब्यावर बसवले जात आहे.
बाजार समिती व गोरक्षण समितीवर गंभीर आरोप
या साऱ्या प्रक्रियेला बाजार समितीच्या काही कर्मचाऱ्यांचेही पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. बाजारातील व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या चिट्या अत्यंत कमी दरात आणि बिनधास्त फाडल्या जात आहेत. गोरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांकडूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून, काही जण चिरीमिरी घेऊन या तस्करीला पाठीशी घालत असल्याचेही स्थानिकांच्या तक्रारीतून पुढे आले आहे.
रवीभाऊ मरपल्लिवार यांच्या नेतृत्वाखालील बाजार समितीच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह
पोंभुर्णा बाजार समितीचे सभापती रवीभाऊ मरपल्लिवार यांच्या नेतृत्वात आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने बाजार समितीने चांगली कामगिरी केली असली तरी, घोसरीच्या बाजारातील ही अवैध तस्करी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. यावर ठोस कारवाई न झाल्यास, बाजार समितीची प्रतिमा धुळीस मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माजी उपसरपंच विजय जाधव यांची मागणी
नांदगाव येथील माजी उपसरपंच तथा पत्रकार विजय जाधव यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती यांनी या अवैध व्यवहारांवर तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. तसेच, जिल्हा प्रशासनानेही या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
---
0 टिप्पण्या
Thanks for reading