Advertisement

नांदगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत

नांदगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थी बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत


नांदगाव (ता. मुल):
तालुक्यातील नांदगाव येथील करण नर्सिंग नवरत्ने (वय २२ वर्षे) हा महाविद्यालयीन विद्यार्थी कालपासून अचानक बेपत्ता झाला असून, या घटनेमुळे नवरत्ने कुटुंबीयांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. करण काल दि. १७ मे रोजी सकाळपासून घराबाहेर गेला, मात्र त्यानंतर त्याचा कुठलाही थांगपत्ता लागलेला नाही.

विशेष म्हणजे, करणकडे असलेला मोबाईल फोन देखील बंद येत असल्यामुळे त्याचा शोध घेणे अधिकच कठीण झाले आहे. कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी परिसरात व ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला, परंतु कुठलीही ठोस माहिती न मिळाल्याने त्यांनी तत्काळ बेंबाळ पोलीस चौकी गाठून ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर प्रशांत गायकवाड, पो. कॉ. सुनील कुळमेथे आणि पो. नाईक मेश्राम हे तपासासाठी नियुक्त करण्यात आले असून, करणचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, करणने कोणत्याही प्रकारची कल्पना न देता घरातून बाहेर पडल्यामुळे त्याच्या बेपत्ता होण्यामागे नक्की कारण काय आहे, याबाबत सध्या तरी काहीही निष्पन्न झालेले नाही. पोलीस यासंदर्भात सर्व शक्य दिशांनी तपास करत आहेत.

कोणाला करणबाबत काही माहिती असल्यास त्यांनी तत्काळ बेंबाळ पोलीस चौकी किंवा मुल पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या