चक फुटाणा : रस्त्याच्या कामात अनियमितता, ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी
दरारा 24 तास न्युज नेटवर्क | पोंभुर्णा, जि. चंद्रपूर
चक फुटाणा गावातील रस्त्याच्या नव्या कामात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, संबंधित कामास तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या श्रेणी-१ अभियंत्याकडे करण्यात आली आहे.
गावकरी अरविंद संपत मानकर यांनी सादर केलेल्या तक्रारीनुसार, श्री. तुळशिराम रोहनकर यांचे घर ते श्री. संतोष पुडके यांचे घर या दरम्यान सुमारे ८.८ मीटर लांबीचा रस्ता नव्याने तयार केला जात आहे. मात्र, या कामासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष बाब म्हणजे, याच रस्त्यावर पूर्वीही काही काम करण्यात आले होते आणि त्या कामाचा कालावधी संपण्याआधीच नव्याने काम सुरू झाल्यामुळे निधीच्या वापराबाबत संशय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जर पुन्हा निधी मंजूर करून हेच काम नव्याने केले जात असेल, तर यामध्ये सरकारी धोरणांचा गैरवापर होत असून, सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काम त्वरित थांबवावे व कोणतेही नवीन आर्थिक व्यवहार होऊ नयेत, अशी त्यांची ठाम मागणी आहे.
तक्रारदारांनी प्रशासनाकडे सखोल चौकशी करण्याची विनंती केली असून, पारदर्शक तपासणीनंतर दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading