Advertisement

ब्रेकिंग न्यूज- विरई येथे भीषण दुर्घटना : तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन पाच म्हशींचा जागीच मृत्यू

ब्रेकिंग न्यूज-
विरई येथे भीषण दुर्घटना : तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन पाच म्हशींचा जागीच मृत्यू..


महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान; भरपाईची जोरदार मागणी

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | प्रतिनिधी - मुल तालुका

विरई (ता. मुल) – आज सकाळच्या सुमारास विरई येथील शेतशिवारात एक हृदयद्रावक घटना घडली. चराईसाठी गेलेल्या पाच म्हशींना तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मृत म्हशींपैकी चार म्हशी शेतकरी शंकर मोहुर्ले यांच्याआहेत, तर एक म्हैस मुरली सोनुले यांची आहे. या अपघाताची माहिती स्थानिकांनी तातडीने महावितरण विभागाला दिली. मात्र, अनेक तास उलटून गेले तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, जुन्या आणि निकृष्ट अवस्थेतील विद्युत तारांची नियमित देखभाल करण्यात महावितरणकडून गंभीर दुर्लक्ष केले जात आहे. याच हलगर्जीपणामुळेच हा जीवघेणा अपघात घडल्याचा आरोप होत आहे.

या दुर्घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, उदरनिर्वाहाचे प्रमुख साधनच गमावल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे महावितरणने नुकसानभरपाई तातडीने द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, संतप्त नागरिकांनी या दुर्घटनेप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत निषेध व्यक्त केला आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून पीडित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या