निर्लेखन आदेशाआधीच शाळेच्या खोल्या, कोंडवाडा व अंगणवाडी शौचालय जमीनदोस्त – विनोद मारशेट्टीवार यांची चौकशीची मागणी
पोंभुर्णा (प्रतिनिधी): देवाडा (बुज.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन वर्गखोल्या, अंगणवाडीतील बालकांचे शौचालय आणि नुकतेच रंगरंगोटी करण्यात आलेली कोंडवाड्याची इमारत हे सर्व शासकीय नियमानुसार निर्लेखन आदेश मिळण्यापूर्वीच पाडण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद मारशेट्टीवार यांनी केली आहे.
शासकीय नियमानुसार, जुन्या इमारती पाडण्याआधी ग्रामपंचायतीकडून निर्लेखन प्रस्ताव पाठवून जिल्हा परिषदेची मंजुरी आवश्यक असते. मात्र, देवाडा येथील संबंधित इमारतींच्या बाबतीत कोणताही अधिकृत निर्लेखन आदेश ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला नसतानाही संबंधित इमारती पाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामसेवकाने या प्रकरणात जबाबदारी झटकत ठेकेदार व अभियंत्यावर बोट दाखवले आहे. “मी ठेकेदारांना कोणतीही इमारत आदेशाअगोदर न पाडण्याची सूचना दिली होती, परंतु त्यांनी ऐकले नाही,” असे ग्रामसेवकाने सांगितले. मात्र, अशा प्रकारच्या जबाबदारी झटकण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मारशेट्टीवार यांनी आणखी काही महत्त्वाच्या बाबींवरही प्रकाश टाकला आहे. पाडण्यात आलेल्या इमारतींच्या साहित्याची नोंद, त्यातून मिळालेला निधी ग्रामपंचायत फंडात जमा झाला की नाही, संरक्षण भिंतीचे झालेले नुकसान भरपाईच्या स्वरूपात वसूल झाले का, अशा सर्व बाबींचा खुलासा करावा, अशी त्यांची मागणी आहे.
विशेष म्हणजे, अंगणवाडीतील लहान मुलांसाठीचे शौचालय नुकतेच २०२३-२४ मध्ये बांधण्यात आले होते. एवढ्या अल्प कालावधीत तेही पाडण्यात आले असल्याने, आता लहान मुलांना शौचास जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.
“ही कारवाई नियमबाह्य असून, सार्वजनिक निधीचा अपव्यय करणारी आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहावी, नागरिकांना योजनांची माहिती मिळावी आणि गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी याप्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी,” असे मत मारशेट्टीवार यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Thanks for reading