देवाडा (बुज) येथील ग्रामरोजगार सेवकाविरोधातील तक्रारीवर चौकशी, ग्रामसभेची मागणी..
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क..
जुनगाव (ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) – देवाडा बुज येथील ग्रामरोजगार सेवकाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गावातील नागरिक सुरेश झाडे व इतर ग्रामस्थांनी पोंभुर्णा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामरोजगार सेवकाला तात्काळ पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीची गंभीर दखल घेत पंचायत समिती पोंभुर्णा येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसचिव यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दिनांक 19 मे 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित चौकशी प्रक्रिया पार पडली. या चौकशीसाठी विस्तार अधिकारी व रोजगार सहाय्यक अधिकारी उपस्थित होते.
चौकशीच्या दिवशी गावातील मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते. चौकशी प्रक्रियेत ग्रामस्थांनी थेट चौकशी अधिकाऱ्यांपुढे आपली मतं मांडली. अनेकांनी ग्रामरोजगार सेवकाविरोधात नाराजी व्यक्त करत त्याच्या कार्यप्रणालीवर गंभीर आरोप केले. त्यामुळे चौकशीला जणू ग्रामसभेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
ग्रामस्थांचा एकच सूर होता — "अशा निष्क्रीय व अपारदर्शक काम करणाऱ्या रोजगार सेवकाला तात्काळ पदावरून हटवण्यात यावे." चौकशी शासन निर्णयानुसार पारदर्शक पद्धतीने पार पडल्याची माहिती चौकशी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मात्र आता ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही ग्रामसभा बोलावण्यात येणार की या प्रकरणाला गुंडाळण्यात येणार?
या पार्श्वभूमीवर तक्रारकर्ते सुरेश झाडे यांच्यासह अनेक पुरुष व महिला ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा, तसेच चौकशीनंतर ग्रामसभा आयोजित करून ग्रामरोजगार सेवकाला पदावरून हाकलण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अशी मागणी केली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading