Advertisement

सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा प्रताप – वडिलांची केली दोनदा तेरवी!


सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचा प्रताप – वडिलांची केली दोनदा तेरवी!

११ मे २०२५ – विशेष प्रतिनिधी

विज्ञान शाखेचे पदवीधर आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या एका जेष्ठ व्यक्तीने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर समाजासमोर अजबच प्रकार केला आहे. वृद्धापकाळाने निधन पावलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व पारंपरिक सोपस्कार आणि तेरवी विधी पार पडल्यावर कुटुंबीयांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक प्रबोधनपर समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.

११ मे रोजी होणाऱ्या स्मृतीसोहळ्यासाठी विशेष पाहुण्यांची निवड करण्यात आली होती. निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या आणि नातेवाईक व मित्रमंडळींसाठी वितरणाचे नियोजन ठरविण्यात आले. मात्र, या सर्व प्रक्रियेला विलक्षण कलाटणी मिळाली.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या जेष्ठ पुत्राने कुटुंबीयांची फसवणूक करत स्मृती सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका वाटण्याऐवजी वडिलांच्या तेरवीच्या नव्या पत्रिका, त्या देखील चुकीच्या मृत्यू दिनांकासह, छापून गुपचूपपणे वितरित केल्या. कोणालाही सुगावा लागू न देता हा प्रकार पार पडला. अखेर सत्य बाहेर आले आणि कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली.

तेरवीचा विधी एकदा पार पडल्यावर पुन्हा त्याचासाठी पत्रिका का छापली गेली? आणि जर स्मृतीप्रेरित कार्यक्रमास विरोध होता, तर त्यासाठी निमंत्रणपत्रिका का छापवून घेतल्या? असे प्रश्न आता सर्वत्र विचारले जात आहेत.

समाजात आदर्श मानल्या जाणाऱ्या शिक्षकांनीच जर असा प्रकार केला, तर समाजात चांगल्या गोष्टींबाबत काय संदेश जाईल, असा संतप्त सवाल आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबात तणावाचे वातावरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या