Advertisement

वाघाच्या हल्ल्यात काका ठार, पुतण्या गंभीर जखमी! – कोसंबी चक परिसरात भीषण घटना


वाघाच्या हल्ल्यात काका ठार, पुतण्या गंभीर जखमी! – कोसंबी चक परिसरात भीषण घटना


दरारा २४ तास न्युज नेटवर्क | चंद्रपूर | २२ मे

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात गुरुवारी (२२ मे) सकाळी कोसंबी चक शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात काका ठार, तर पुतण्या गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. बंडू परशुराम उराडे (५५) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा पुतण्या किशोर मधुकर उराडे (३५) सध्या गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे.

घटनेचा सविस्तर आढावा:

करवन (ता. मुल) येथील काही गुराखी सकाळी सातच्या सुमारास गावापासून सुमारे तीन किमी अंतरावरील कोसंबी चक शेतशिवारात जनावरे चारण्यासाठी गेले होते. यामध्ये बंडू व किशोर उराडे हे काका-पुतण्या सहभागी होते. जनावरे चरत असताना सुमारे आठच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक बंडू उराडे यांच्यावर हल्ला चढवला. काही अंतरावर असलेल्या पुतण्याने आरडाओरड ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिकारादरम्यान किशोर उराडे देखील गंभीर जखमी झाला.

इतर गुराख्यांनी आरडाओरड करत घटनास्थळी धाव घेतली आणि वनविभाग व पोलिसांना माहिती दिली. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून जखमी किशोर याला तत्काळ मुल येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

१३ दिवसांत ९ बळी – नागरिकांमध्ये तीव्र संताप

सदर घटना संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. १० मेपासून आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यांत ९ जणांचा बळी गेला असून, त्यातील ४ बळी हे केवळ मुल तालुक्यातील आहेत. सात जण तेंदूपत्ता तोडणीसाठी गेले असताना, एक जण बकरीसाठी चारा आणत होता, तर आजचा एक शेतशिवारात गुरे चारताना हल्ल्यात बळी पडला.

वनविभाग अपयशी?

वाघांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. वनविभागावर निष्क्रियतेचे आरोप होत असून, नागरिकांनी वाघाच्या बंदोबस्ताची मागणी तीव्र केली आहे. शेती आणि जनावरांवर उपजीविका असलेल्या ग्रामीण जनतेसाठी ही अवस्था जीवघेणी ठरत आहे.


---

१३ दिवसांची वाघहल्ल्यांची भीषण मालिका:

१० मे – सिंदेवाही तालुक्यात एकाच दिवशी ३ महिलांचा मृत्यू

११ मे – मुल तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू

१२ मे – मुल तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू

१४ मे – चिमूर तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू

१८ मे – नागभीड व मुल तालुक्यातील दोघा इसमांचा मृत्यू

२२ मे – मुल तालुक्यातील काका ठार, पुतण्या गंभीर जखमी



---

थांबणं आवश्यक!
ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे. वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.


---



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या