दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी
अहेरी, दि. २३ मे – गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव कीरसान यांच्या अध्यक्षतेखाली आज अहेरी तहसील कार्यालयात अहेरी तालुक्यातील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शासकीय योजनांची अंमलबजावणी, अपूर्ण विकासकामे, आदिवासी व मागासवर्गीय भागातील मूलभूत सुविधा, तसेच प्रशासनिक अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आदिवासी जिल्हा सेल अध्यक्ष हनुमंत मडावी, अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. निसार हकीम, तहसीलदार सूर्यवंशी, गटविकास अधिकारी जुवारे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी सरपंच अजय नेताम, सामाजिक कार्यकर्ते अरुण बेईतिलवार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रिजवान शेख, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष राहुल आईलवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत आरोग्य सेवा, रस्त्यांची दयनीय अवस्था, अपूर्ण जलसंधारण प्रकल्प, विज वितरणातील अडचणी, शिक्षण व्यवस्था, शेतीसंबंधित समस्या तसेच रोजगार हमी योजनेतील अपारदर्शकता यावर सखोल चर्चा झाली. पिण्याच्या पाण्याची टंचाई, प्रलंबित वनहक्क प्रकरणे आणि आदिवासी जनतेच्या समस्या यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना खासदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
खासदार डॉ. नामदेव कीरसान यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की, “अहेरी तालुका हा दुर्गम व आदिवासीबहुल भाग असून येथील सर्वांगीण विकास ही माझी सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. प्रशासनाने जनतेच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा मी संसदेत आवाज उठवणार आहे.”
बैठकीच्या शेवटी उपस्थित प्रतिनिधींनी आपापले मत व्यक्त केले आणि तालुक्याच्या एकात्मिक विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार केला.
0 टिप्पण्या
Thanks for reading