Advertisement

देवाडा बूजमध्ये रोजगार सेवकावर गंभीर आरोप; ग्रामस्थांची पदमुक्तीची मागणी

देवाडा बूजमध्ये रोजगार सेवकावर गंभीर आरोप; ग्रामस्थांची पदमुक्तीची मागणी


जुनगाव (ता. पोंभुर्णा) –देवाडा बुज. गावातील रोजगार हमी योजनेत अनियमितता आणि भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत देवाडा बूज येथील ग्रामस्थांनी रोजगार सेवक विकास गंगाधर मेश्राम यांची तात्काळ पदावरून मुक्तता करण्याची जोरदार मागणी केली आहे. समस्त महिला व पुरुष ग्रामस्थांनी एकत्र येत प्रशासनाकडे लेखी तक्रार निवेदन सादर केले आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रोजगार सेवक मेश्राम हे आपल्या पदाचा दुरुपयोग करत असून, रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये गंभीर अनियमितता करत आहेत. गावातील अनेक बेरोजगार युवकांना कामाची संधी नाकारण्यात आली असून, रोजगार हमीच्या योजनांपासून त्यांना वंचित ठेवले जात आहे.

तसेच, योजनेत होणाऱ्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून, कामात दर्जेदारतेचा पूर्ण अभाव आहे. विशेष म्हणजे, गोरगरीब युवक व नागरिकांकडून जॉब कार्ड तयार करून देण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये लाच घेतली जात असल्याचेही ग्रामस्थांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून, रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेल्या मजुरांशी रोजगार सेवक उर्मट वागणूक देतो आणि “तुम्ही कशाला कामावर येता?” अशी भाषा वापरतो, असेही आरोप करण्यात आले आहेत.

या तक्रारीची दखल घेत ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलेले निवेदन पुढील कार्यालयांना देण्यात आले आहे:

1. मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर

2. उपमुख्य कार्यपालन अधिकारी, रोजगार हमी योजना चंद्रपूर

3. जिल्हाधिकारी, जिल्हा कार्यालय चंद्रपूर

4. पालकमंत्री, चंद्रपूर – महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई

5. आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क या प्रकरणावर पुढील कारवाईची बारकाईने दखल घेणार असून, संबंधित यंत्रणांनी ग्रामस्थांच्या तक्रारीची गंभीरतेने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या