Advertisement

अवकाळी पावसामुळे पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी — जीवनदास गेडाम

अवकाळी पावसामुळे पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी — जीवनदास गेडाम


प्रतिनिधी: पोंभुर्णा
पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव आणि आसपासच्या भागात उन्हाळी हंगामातील धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या अनपेक्षित आगमनामुळे शेतकऱ्यांचे पिके भुईसपाट झाली असून, अंतिम टप्यात असलेले उभे पीक पूर्णतः खराब झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि निराशा पसरली आहे.

तालुक्यातील अनेक शेतकरी पारंपरिकपणे उन्हाळी धान उत्पादनावर अवलंबून असतात. यावर्षी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली होती. मात्र, मेघगर्जनेसह आलेल्या वादळी वाऱ्याने पावसाचा जोर वाढला आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी धान काढून सुकवण्यासाठी टाकले होते, ते देखील पूर्णपणे सडून गेले आहेत. अशा प्रकारच्या निसर्गाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

शिवसेनेचे तालुका उपप्रमुख जीवनदास गेडाम यांनी या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी प्रसिद्धी माध्यमातून एक निवेदन जारी करत, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

“शेतकऱ्यांनी मेहनतीने उभे केलेले पीक एका रात्रीत वाया गेले आहे. प्रशासनाने त्वरित कृती करून शेतकऱ्यांच्या दु:खात मदतीचा हात द्यावा,” असे गेडाम यांनी म्हटले आहे.

या नुकसानीची दखल घेऊन तालुका प्रशासनाने यंत्रणा सक्रिय करून तातडीने पंचनामे सुरू करावेत, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. याशिवाय, नुकसानभरपाईसाठी विशेष निधी मंजूर करून शेतकऱ्यांना आर्थिक आधार द्यावा, ही शेतकऱ्यांची आणि स्थानिक नेतृत्वाची एकमुखी मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या