वाघाच्या हल्ल्यात संजवना मॅकलवार यांचा मृत्यू; मानव-वाघ संघर्ष पुन्हा ऐरणीवर
मुल (ता. २७ मे) – मुल तालुक्यातील टोलेवाही ते भगवानपूर रस्त्यालगत पोल्ट्री फार्मजवळ आज मंगळवारी सकाळी ८ वाजता दरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली. चारोली गावातील संजवना संजय मॅकलवार (वय ४२) या महिला सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या असता, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि त्या जागीच ठार झाल्या.
ही घटना कपार्टमेंट क्रमांक ५२४ च्या हद्दीत घडली. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे संजनवाचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शरीर आढळून आले. यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी, चिरोली येथील वन कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
सध्या वाघ-मानव संघर्षाच्या घटना सातत्याने वाढत असून वनविभागासमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. दिवसा उजळताही वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवाचा बळी जाणे ही फक्त दुर्घटना नसून त्यामागे जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न आज उपस्थित झाला आहे.
भगवानपूर परिसरात सध्या शाळांना सुट्या असल्यामुळे मुलांची वर्दळ नाही, मात्र शाळा सुरु होताच अनेक विद्यार्थी चिरोली येथे पायदळ किंवा सायकलवरून शिक्षणासाठी प्रवास करतात. त्यामुळे भविष्यात आणखी मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वनविभागाने यावर त्वरित ठोस उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा उद्या वाघ गावांमध्ये शिरतील आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण होतील. ग्रामीण भागात पुनर्वसन, जनजागृती आणि जंगलात वावरण्याच्या नियमांचे काटेकोर पालन या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी आवश्यक बनली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading