Advertisement

जुनगावात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार! – पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, ग्रामस्थ त्रस्त

जुनगावात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार! – पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, ग्रामस्थ त्रस्त



पोंभुर्णा (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील जुनगाव येथे गेल्या पाच दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. गावातील पाणीपुरवठा योजना नादुरुस्त झाल्यामुळे अर्ध्याहून अधिक गावात भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे ही अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत असून, तरीसुद्धा अद्याप पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही.

पाण्याअभावी नागरिकांना लांबवरून पाणी आणावे लागत असून, यामुळे महिलांचे विशेषतः हाल होत आहेत. घरगुती कामे, शेतीसाठीचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करताना ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत.

ग्रामसेवकांवर दुर्लक्षाचा आरोप
गावातील नागरिकांनी आणि महिलांनी प्रशासनावर तसेच ग्रामसेवकांवर गंभीर आरोप केले असून, त्यांनी या समस्येकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. वेळेवर दुरुस्तीचे काम हाती घेतले असते, तर अशी भीषण स्थिती उद्भवली नसती, अशी भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

तत्काळ उपाययोजना करावी – ग्रामस्थांची मागणी
या समस्येवर तातडीने उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन फुटलेली पाईपलाईन त्वरित दुरुस्त करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रशासनाचा प्रतिसाद अपेक्षित
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, ग्रामस्थांच्या आरोग्याशी आणि रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

(प्रतिनिधी, पोंभुर्णा)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या