मोफत रेती? पण वाहतुकीसाठी मोजावे लागतात ३ हजार रुपये!
लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी; शासनाच्या योजनेला अंमलात अडथळे
पोंभुर्णा (प्रतिनिधी) – घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शासनाकडून ५ ब्रास मोफत रेती देण्याचे धोरण लागू करण्यात आले आहे. मात्र, रेती मोफत असली तरी ती घरपोच नेण्यासाठी लागणाऱ्या वाहन भाड्यामुळे लाभार्थ्यांना सुमारे ३ हजार रुपयांचा खर्च येत आहे. परिणामी लाभाऐवजी आर्थिक भुर्दंड बसत असल्याने अनेक लाभार्थी हतबल झाले आहेत.
पोंभुर्णा तालुक्यातील १० अधिकृत रेती घाटांमधून लाभार्थ्यांना सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत रेती उचलण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी लाभार्थ्यांना ग्रामसेवकांनी दिलेली रेती टिपी, आधारकार्ड, मोबाईल नंबर तसेच ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या नोंदणी क्रमांकासह मजुरांची सोय करून घाटावर जावे लागत आहे.
महसूल विभागाने २२ मेपासून हा उपक्रम सुरु केला असला, तरी प्रत्यक्षात पावसामुळे रेती उपसण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. याशिवाय, वाहतूक खर्च, वाहनधारकांची टंचाई आणि भाडेवाढीमुळे लाभार्थ्यांचा हिरमोड होत आहे.
अवैध रेती तस्करी सुरूच
दरम्यान, अधिकृत रेती घाटांमधूनच मोफत रेती पुरवली जाण्याचे शासन धोरण असले, तरी रात्रीच्या वेळेस काही ठिकाणी अजूनही अवैध तस्करी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या मार्गाने काहीजण ४ हजार रुपये ट्रॅक्टर दराने घरपोच रेती मिळवत आहेत.
३६४५ लाभार्थ्यांना लाभाचे उद्दिष्ट
तालुक्यात सुमारे ३६४५ घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेतीचा लाभ मिळावा यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील आहे. मात्र, नियोजनातील त्रुटी, प्रत्यक्ष खर्च आणि हवामानातील बदलांमुळे योजना अडचणीत सापडलेली आहे.
संपादन सूचना असल्यास जरूर कळवा.
0 टिप्पण्या
Thanks for reading