कामगारविरोधी श्रम संहिता व जनविरोधी जनसुरक्षा विधेयक मागे घ्या — CITU कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दरारा 24 तास..
चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकारने करोना काळात विरोधी पक्ष सभागृहात नसताना कामगारविरोधी 'चार श्रम संहिता कायदे' आणि महाराष्ट्रात जनविरोधी 'विशेष जनसुरक्षा विधेयक' आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे दोन्ही कायदे लोकशाहीविरोधी व जनतेच्या हिताविरुद्ध असल्याचा आरोप करत गेल्या अनेक वर्षांपासून विविध कामगार संघटना सातत्याने या कायद्यांचा विरोध करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर, चंद्रपूर जिल्ह्यातही CPIM व CITU यांच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. गौडा यांना एका शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या कामगारविरोधी चार श्रम संहितांसह राज्य सरकारच्या विशेष जनसुरक्षा विधेयकाला विरोध नोंदवत हे विधेयक त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यात दोन महिन्यांपासून सतत स्वाक्षरी मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेत सर्व विरोधी पक्ष, विविध सामाजिक संघटना, संस्था, बुद्धिजीवी, साहित्यिक, कलाकार व सामान्य नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला असून आतापर्यंत सुमारे 5000 स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या आहेत. ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे.
निवेदन सादर करताना सीपीआयएमचे ज्येष्ठ कामगार नेते कॉ. रमेशचंद्र दहिवडे, जिल्हा सचिव कॉ. राजेश पिंजरकर, CITU चे जिल्हा संघटक कॉ. अरुण भेलके, CTPS कामगार संघटनेचे अध्यक्ष वामन मानकर, पुनालाल घरत, नागोराव शेंडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.
या कायद्यांचा निषेध करत संयुक्त कामगार संघटनांनी देशव्यापी आंदोलन व राष्ट्रव्यापी संपाची चेतावणी दिली आहे. भांडवलदारधार्जिण्या धोरणांविरोधात संघर्ष उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
0 टिप्पण्या
Thanks for reading