डोंगरसांवंगीतील थरार: घरात शिरलेल्या बिबट्याला १० तासांच्या रेस्क्यू मोहिमेनंतर जेरबंद |
दरारा 24 तास न्युज नेटवर्क |
गडचिरोली: जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील डोंगरसांवंगी गावात गुरुवारी (२२ मे) रात्री एक थरारक घटना घडली. शिकारीच्या शोधात गावात आलेल्या बिबट्याने थेट एका घरात प्रवेश केला. या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वनविभाग आणि पोलिसांनी रात्रभर रेस्क्यू मोहीम राबवून तब्बल १० तासांच्या प्रयत्नांनंतर मध्यरात्री २ वाजता बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश मिळवलं.
डोंगरालगत असलेलं गाव, बिबट्याची वाढती हालचाल
डोंगरसांवंगी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं असून परिसरात बिबट्याचा नेहमी वावर असतो. मागील पाच दिवसांपासून एक बिबट्या गावात शिरकाव करत होता. त्याने गावातील दोन श्वानांची शिकार केली असून, तीन दिवसांपूर्वी एका घरात बांधलेल्या शेळीवरही हल्ला केला होता. लोकांच्या आरडाओरडीनंतर तो पळून गेला होता.
घरात घेतला आश्रय, गावकऱ्यांची चिंता वाढली
गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास बिबट्याला पुन्हा गावात फिरताना पाहण्यात आलं. गोंधळ उडाल्यानंतर त्याने चंद्रभागा पुरुषोत्तम श्रीरामे यांच्या घरात आश्रय घेतला. तो घराच्या धाब्यावर चढून एका कोपऱ्यात दडून बसला होता.
रेस्क्यू मोहीम सुरू, पोलिसांचा बंदोबस्त
बिबट्याला पकडण्यासाठी गडचिरोली येथून विशेष रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं. गर्दी वाढू लागल्याने जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आलं. घरातील सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद करून सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली.
१० तासांच्या प्रयत्नांनंतर जेरबंद, नैसर्गिक अधिवासात सोडला
सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेल्या रेस्क्यू मोहिमेला मध्यरात्री २ वाजता यश आलं. बिबट्याला गुंगीचं इंजेक्शन देऊन त्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलं. त्यानंतर लगेचच त्याला वडसा येथे नेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं.
वनविभागाची तत्परता, ग्रामस्थांनी घेतला निश्वास
या मोहिमेत वडसाचे उपवनसंरक्षक बी. वरूण, पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेहेर, क्षेत्र सहायक अरुण गेडाम, वनरक्षक विकास शिवणकर, नितीन भोयर आणि इतर कर्मचारी सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी वनविभागाच्या तात्काळ प्रतिसादाचे कौतुक करत सुटकेचा निश्वास सोडला.
0 टिप्पण्या
Thanks for reading