जुनगाव - देवाडा बुज परिसरात वीज समस्या गंभीर; महावितरणचे अक्षम्य दुर्लक्ष
जुनगाव/देवाडा बुज, पोंभुर्णा तालुका (प्रतिनिधी) — तालुक्यातील जुनगाव - देवाडा बुज परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून भीषण वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. विजेचा पुरवठा दिवसेंदिवस विस्कळीत होत असून, अनेकवेळा तासन्तास वीज गायब राहत असल्याने जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लाईनमन अनुपलब्ध, अधिकारी गप्प!
महावितरण विभागाकडून आवश्यक त्या दुरुस्ती व देखभालीकडे साफ दुर्लक्ष होत आहे. लाईनमन किंवा अन्य कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. अनेकदा वीज खंडित झाल्यानंतर तांत्रिक दोष दूर होण्यास 8 ते 10 तासांचा कालावधी लागतो, परिणामी घरगुती, शेती व लघुउद्योगधंदे यावर मोठा परिणाम होत आहे.
शेतीपिकांवर होतोय परिणाम, शेतकरी हवालदिल
शेतकरी वर्गासाठी तर ही वीज टंचाई अधिकच त्रासदायक ठरत आहे. विद्युत पंप बंद पडल्याने पिकांना पाणी देता येत नाही, परिणामी उत्पादनात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागरिकांचा उद्रेक होण्याच्या उंबरठ्यावर!
या वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे स्थानिक नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. अनेकांनी महावितरणच्या कार्यालयात तक्रारी केल्या असूनही ठोस कारवाई होत नसल्याने आता जनआंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक प्रशासनाने घ्यावी तत्काळ दखल
दरारा 24 तास न्युज नेटवर्कच्या वतीने प्रशासन व महावितरण विभागाकडे विनंती करण्यात येते की, या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे व नियमित वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा.
0 टिप्पण्या
Thanks for reading