Advertisement

सिरोंच्यातील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची नांगरणी प्रकरण – वनपरिक्षेत्राधिकारी सुधीर सुरपाम निलंबित



सिरोंच्यातील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची नांगरणी प्रकरण – वनपरिक्षेत्राधिकारी सुधीर सुरपाम निलंबित



दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | गडचिरोली – आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353D वरील तमनदाला फाटा ते अमडेली दरम्यानचा सुमारे एक किलोमीटरचा गिट्टी टाकून तयार केलेला रस्ता, वनकायद्याचा हवाला देत सिरोंचा वनविभागाकडून ट्रॅक्टर लावून नांगरण्यात आला होता. हा प्रकार स्थानिक जनतेसाठी मोठा धक्का ठरला. या रस्त्याने नागरिकांचा प्रवास सुलभ होत असताना तो उद्ध्वस्त केल्याने संतापाची लाट उसळली.

जमिनीवरची ही कारवाई माध्यमांनी मोठ्या परखडपणे मांडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत फडणवीसांनी संबंधित वनअधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले व योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

या पार्श्वभूमीवर सिरोंचा वनपरिक्षेत्राचे अधिकारी सुधीर सुरपाम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सामान्य जनतेच्या रोषानंतर आणि प्रसारमाध्यमांनी पाठपुरावा केल्यानंतर झाल्याने, याचा सकारात्मक प्रतिसाद स्थानिकांमध्ये उमटताना दिसत आहे.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विकासकामांना विरोध करण्याच्या नावाखाली वनविभागाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे नागरिकांचे हाल होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


ताज्या बातम्यांसाठी व updates साठी वाचा – [दरारा 24 तास न्यूज नेटवर्क]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या