Advertisement

जनावरांच्या तस्करीसोबतच चोरीचे प्रकारही वाढले – शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! जूनगाव येथील शेतकऱ्याची बैलजोडी चोरीला – गोरक्षक समितीकडून कठोर कारवाईची मागणी

जनावरांच्या तस्करीसोबतच चोरीचे प्रकारही वाढले – शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!


जूनगाव येथील शेतकऱ्याची बैलजोडी चोरीला – राष्ट्रीय मराठा गौरक्षक किसान सभा ची कठोर कारवाईची मागणी


प्रतिनिधी – पोंभुर्णा, दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा तालुक्यात सध्या गोवंश तस्करीसह जनावरांच्या चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांनी तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

अलीकडेच जूनगाव येथील शेतकरी प्रमोद मार्कंडी मंडोगडे यांची अंदाजे ८० ते ९० हजार रुपये किमतीची बैलजोडी अज्ञात चोरांनी रात्रीच्या सुमारास त्यांच्या गोठ्यातून चोरून नेली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना प्रबळ झाली आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुपचूपपणे कार्यरत असलेल्या जनावरांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे हालचाली तालुक्यात वाढल्या आहेत. हे टोळके रात्रीच्या वेळी गावात घुसून गायी-बैलांना चोरतात आणि त्यानंतर चारचाकी वाहनांमधून त्यांना कत्तलखान्यांपर्यंत पोहोचवतात. या प्रकारामुळे केवळ जनावरांचे नुकसान होत नाही, तर पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे जगणेही संकटात सापडले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मराठा गौरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना (शिंदे गट) चे बल्लारपूर विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकाराची सखोल चौकशी करून जनावरांची चोरी व तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

"हा केवळ चोरीचा प्रश्न नाही, तर शेतकऱ्यांच्या जगण्याशी निगडित आहे. अशा टोळ्यांना पकडून त्यांच्या मुळापर्यंत पोहोचून कार्यवाही झाली पाहिजे," असे चांदेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, स्थानिक पोलीस प्रशासनाने या घटनेची नोंद घेतली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांत अस्वस्थता आणि नाराजी वाढत आहे. या प्रकरणात लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडून जनतेला न्याय मिळावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी व्यक्त करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या