निर्माणाधीन महामार्गावर ट्रकची दुचाकीला जबर धडक; माय-लेकीचा जागीच मृत्यू, नागरीकांत तीव्र संताप
दरारा 24 तास न्युज नेटवर्क | राजुरा
राजुरा शहरातील पेठ वॉर्डातील ज्योती बंडू रागीट (वय ४२) व त्यांची मुलगी सेजल बंडू रागीट या दोघींचा एका अज्ञात ट्रकच्या भीषण धडकेत जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही दुर्घटना राजुरा-बल्लारपूर मार्गावरील जलाराम बाप्पा मंदिराजवळ घडली असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माय-लेकी MH-३४ BN ५५३८ क्रमांकाच्या दुचाकीवरून राजुराहून बल्लारपूरकडे निघाल्या होत्या. वर्धा नदीचा पूल ओलांडल्यानंतर काही अंतरावर, जलाराम बाप्पा मंदिराजवळ, एका अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबर होती की दोघींचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे वाढते अपघात
बामणी-राजुरा ते आदिलाबाद दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र या कामात पुरेशी दक्षता न घेतल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांची तीव्र तक्रार आहे. रस्त्याची उंची वाढवण्यासाठी रस्त्यावर मातीचे मोठे ढिगारे टाकण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारचे नियोजन किंवा सुरक्षाव्यवस्था नसल्यामुळे माती रस्त्यावर पसरते, जी पावसात चिखल आणि कोरड्या हवामानात धुळीचे साम्राज्य निर्माण करते.
नुकत्याच झालेल्या पावसात रस्त्यावर चिखल साचून अनेकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. हा महामार्ग सध्या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास आणखीही अपघात होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.
नागरिकांमध्ये संतापाची लाट
या दुर्घटनेनंतर राजुरा शहर व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महामार्ग विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेपर्वा कामांवर रोष व्यक्त होत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे अपघातग्रस्त भागात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
🛑 प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलली नाहीत, तर हे महामार्ग मृत्यूमार्ग बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0 टिप्पण्या
Thanks for reading