Advertisement

बल्लारपूरचे नाव देशात मोठं करा, पण आई-वडिलांना विसरू नका!" — आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा विद्यार्थ्यांना सल्ला





"बल्लारपूरचे नाव देशात मोठं करा, पण आई-वडिलांना विसरू नका!" — आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

बल्लारपूर | प्रतिनिधी

बल्लारपूर येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. "विद्यार्थ्यांनी आपल्या यशाच्या माध्यमातून बल्लारपूरचं नाव उज्ज्वल करावं, पण ज्या आई-वडिलांनी संघर्षातून आपल्याला मोठं केलं, त्यांचा विसर कधीही पडू देऊ नका," अशा शब्दांत त्यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महामंत्री संध्याताई गुरनुळे, डॉ. मंगेश गुलवाडे, रणजयराज सिंग, निलेश खरबडे, वैशाली जोशी, नम्रता आचार्य, रेणुका दुधे, देवा वाटकर यांची उपस्थिती होती.

"स्वतःसाठीच नव्हे, गाव व देशासाठी मेहनत करा"

"शिक्षण घेताना 'मी केवळ माझ्या कुटुंबासाठी नाही, तर गाव, जिल्हा आणि देशासाठीही काहीतरी करणार' हा भाव मनात ठेवणे गरजेचे आहे," असे ते म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षणविकासासाठी आपले प्रयत्न अविरत सुरू आहेत. वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय, S.N.D.T. विद्यापीठ केंद्र, कृषी महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉलेज, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, वाचनालये व अभ्यासिका यांचा त्यांनी उल्लेख केला.

शिक्षण हे संस्कारी असावं

"खूप शिकून जर आपल्याला आई-वडिलांचा सन्मान करताना लाज वाटत असेल, तर ते शिक्षण व्यर्थ आहे," असे ते ठामपणे म्हणाले. "शिक्षण हा सर्वात मोठा अलंकार असून, त्यात माणुसकी असली पाहिजे. पैसा महत्त्वाचा आहे, पण मनाचा आत्मविश्वास व सकारात्मकता हे यशाचे खरे स्रोत आहेत," असे मार्गदर्शन त्यांनी केले.

संधी ओळखून काम करा, परफेक्शन ठेवा

"संधीच्या शोधात रहा. आपल्या गुणदोषांची यादी तयार करा. जगात कोणीही परिपूर्ण नाही, पण आत्मपरीक्षणातूनच योग्य दिशा सापडते," असे सांगून त्यांनी प्रत्येक कामात जपानी परफेक्शनचे महत्त्व समजावले.

एडिसनच्या कथेतून दिला संदेश

थॉमस एडिसनच्या संघर्षमय आयुष्याची कथा सांगताना, "आईच्या प्रोत्साहनामुळे त्याने जग बदललं. ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’ हे लक्षात ठेवा," असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये आशा आणि आत्मविश्वास जागवला.

‘योग करा, डायरी लिहा, मन ताजेतवाने ठेवा’

"दररोज योग, ध्यान, शांत झोप आणि एक पान डायरी लिहिणे ही यशाच्या वाटचालीतील साधी पण प्रभावी टप्पे आहेत," असा उपयुक्त सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.


दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

📌 संपर्कात राहा - तुमच्या परिसरातील प्रेरणादायी बातम्यांसाठी!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या