पोंभुर्ण्यात विजेचे खांबेच चोरीला! चोरांची बेधडक कारवाई; शेतकरी संकटात
पोंभुर्णा (जुनगाव), ता. 26 जून:
पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथे रात्रीच्या सुमारास विजेच्या तारांची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी थेट खांबेच कापून टाकले. या धक्कादायक घटनेमुळे ऐन शेतीच्या हंगामात शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतांमध्ये विद्युतपुरवठा करणाऱ्या खांबांना चोरट्यांनी धातू कापणाऱ्या मशिनच्या साहाय्याने छाटले. त्यानंतर सर्व वायर व तार एकत्र करून ते पळून गेले. सकाळी शेतकरी शेताकडे गेले असता हे दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. संपूर्ण रांगेतील खांबे खाली पडलेले आणि तार गायब असल्याचे समोर आले.
ही घटना केवळ चोरीची नाही, तर शेतकऱ्याच्या कष्टांवरचा घाला आहे. सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे आणि विजेविना मोटार पंप सुरू न झाल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने महावितरण आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू केला आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
– दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading