आज माझी मोठी आत्या श्रीमती विमलबाई गव्हारे यांनी वयाच्या ७८व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हे आमच्या संपूर्ण परिवारासाठी अपरिमित दुःखदायक क्षण आहे.
माझ्या बालपणीच्या आठवणींतून सुरुवात केली तर... मी दुसरी-तिसरीत असताना देवाडा गावी आजोळी होतो. त्या काळात कॉलरा आणि गॅस्ट्रोची साथ पसरली होती. गावात अनेकजण आजारी पडले, सलाईनच्या रांगा लागल्या होत्या. त्या वेळी मोबाईल नव्हते, फोन नव्हते, पण आत्याला बातमी मिळाली आणि ती तत्काळ देवाडा येथे पोहोचली.
पोंभुर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती देऊन तिने तिथे आरोग्य शिबिर उभारायला लावले. तेथील आरोग्य अधिकाऱ्यांना फटकारून तिने विचारले, "तुमची यंत्रणा काय करत होती?" विहिरीत ब्लिचिंग नाही, नाल्यांत घाण, सगळे गाव आजारी – हे तिने ठणकावून सांगितले.
ही माझी अशिक्षित आत्या, आरोग्य विभागाच्या कोणत्यातरी समितीची सदस्य होती, हे मला तेव्हा कळलं. अशिक्षित असूनही तिच्यातली ताकद, जाण, आणि जनतेसाठी असलेली झीज आजही आठवते.
तिने आयुष्यभर गरिबीत दिवस काढले, पण आपल्या हातात असलेलं थोडंसंही इतरांना दिल्याशिवाय ती राहिली नाही. तिचं जीवन म्हणजे झगड्याचं प्रतीक होतं. संकटांच्या काळात ती कायम पुढे असायची – कोणताही अधिकारी असो, पोलीस असो – ती न घाबरता, खंबीरपणे निर्णय घ्यायची.
मी चौथीमध्ये असताना शाळेतील एका गाण्याची ओळ गुणगुणत होतो –
“आता भोवताली गोंडाचा घेरगड्या माझा...”
तेव्हा आत्या पुढची ओळ म्हणाली! मला आश्चर्य वाटलं – “आत्या तुला हे गाणं कसं माहीत?” ती हसून म्हणाली – “अरे, हा गोंडी ढेमसा नाही का गा!”
तिचं ज्ञान केवळ लोकजीवनापुरतं मर्यादित नव्हतं, तर गोंडी संस्कृती, बैलांची तब्येत, घरगुती औषधे, सगळ्याच बाबतीत तिला अनुभव होता.
एकदा संध्याकाळी ती घरी आली आणि लगेच म्हणाली – “बैल बघ, याच्या पोटात दुखतंय.” आणि लगेच घोंगडा फिरवायला सांगितलं. तिने ते ओळखलं... इतकं बारकं निरीक्षण आणि अनुभव केवळ तिनेच कमावले होते.
एकदा गावातील तेली समाजात वाद झाला होता. तेव्हा ती म्हणाली – “सगळे माझे भाऊ आहेत, मी सर्वांशी बोलणार.” तिने गावातले वाद मिटवले. तिची समाजसुधारणेतील भूमिका प्रभावी होती.
तिने आपल्या विशाल परिवारातील प्रत्येकाची काळजी घेतली – आबालवृद्धांची सेवा केली. नाना-नानींना शेवटपर्यंत सांभाळलं.
अलीकडेच ती माझ्या मावस भावाच्या लग्नालाही हजर होती. पण त्यानंतर तब्येत खालावली... एक महिन्यात ती हे विश्व सोडून गेली. आठ तारखेला ती काकाशी फोनवर बोलली, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली, भेट बोलली – पण नियतीने त्या बहीण-भावाची अखेरची भेट घडवली नाही...
आता आम्ही अडल्यावर, विचारायचं कुणाला? गावातील नातेसंबंध, आजारपण, कार्यक्रम, कोण कुठे राहतं – या साऱ्याची माहिती तिला असायची.
“आत्या, तूच माझ्या आत्मचरित्राची मौखिक आधार होतीस... आता तुला फोन करून विचारू तरी कुणाला?”
डोळ्यासमोर तूच आहेस. तुझ्या आठवणी आणि तुझा मार्गदर्शन कायम आमच्यासोबत राहील.
तुला विनम्र आदरांजली...
– तुझाच शोकाकुल, योगा
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क साठी
0 टिप्पण्या
Thanks for reading