✍️ सुखसागर झाडे, गडचिरोली
दिनांक – 5 ऑगस्ट 2025
गडचिरोली – जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शंकर ढोलगे, श्रीकृष्ण वाघाडे आणि रवी सेलोटे यांनी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर गेल्या 48 दिवसांपासून अविरत ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई न करणे, काही वनविभागीय कर्मचाऱ्यांची कंपन्यांशी विशेष मेहरबानी आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे उचलून धरत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी करण्यात येत आहे.
आंदोलनकर्त्यांनी वारंवार आवश्यक पुरावे आणि माहिती सादर केली असतानाही, आजपर्यंत वनविभागातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साधी भेट किंवा विचारपूसही केलेली नाही, हे अधिक चिंताजनक आहे. यामुळे या आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवण्यासाठी लोकशाहीच्या मार्गावर ठाम राहावे लागत आहे.
दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी आणि प्रकाश थुल यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी थेट मुख्य वनसंरक्षकांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता, दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाले. मात्र उपवनसंरक्षक वडसा यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी फोन न उचलल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
48 दिवसांपासून सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनाकडे वनविभाग प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. यावरून राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने सवाल उपस्थित केला आहे की – “गडचिरोली जिल्ह्यातील वनविभाग प्रशासन हे आंदोलनकर्त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे लक्ष देईल का?”
0 टिप्पण्या
Thanks for reading