✍️ सुखसागर एम. झाडे | चामोर्शी
अवयव दानाने मिळेल नवे जीवन — चामोर्शीत जागरूकता व रंगोत्सव
हर घर तिरंगा मोहिमेतर्गत महिला महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन
चामोर्शी :
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार २ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या “हर घर तिरंगा” मोहिमेतर्गत दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय, चामोर्शी येथे “अवयव दान हेच जीवनदान” या जनजागृतीचा संदेश देण्यासाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम व आकर्षक रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चामोर्शी संचलित महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग, तसेच ग्रामीण रुग्णालय चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. प्रविण किलनाके, समुपदेशक पुरुषोत्तम घ्यार, नागेश मादेशी, राजेंद्र अल्लीवार आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ मेश्राम उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शिल्पा काशटीवार होत्या.
डॉ. किलनाके यांनी विद्यार्थिनींना अवयव दानाची गरज, त्यामागील वैद्यकीय प्रक्रिया आणि त्यातून वाचणारे असंख्य जीव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “अवयव दानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचतात, त्यामुळे समाजातील प्रत्येकाने या कार्यात पुढाकार घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
समुपदेशक नागेश मादेशी यांनी एचआयव्ही व एड्स यातील फरक स्पष्ट करून आजाराची कारणे व प्रतिबंधात्मक उपाय सांगितले. पुरुषोत्तम घ्यार यांनी लैंगिक संसर्गजन्य आजारांचे कारण व त्यावरील प्रतिबंधक उपाय यांची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. शिल्पा काशटीवार यांनी, “दान एकाचं — जीवन अनेकांचं” हे घोषवाक्य देत, अवयव दानाचा संदेश तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान विद्यार्थिनींना केले.
या वेळी विद्यार्थिनींनी “अवयव दान” या विषयावर आकर्षक रांगोळ्या साकारत “अवयव दान हे अमूल्य जीवनदान” हा संदेश प्रभावीपणे मांडला. घोषवाक्ये व पोस्टरद्वारेही जनजागृती करण्यात आली.
रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक मानसी गेडाम तर द्वितीय पारितोषिक श्रुतिका सोनटक्के यांना मिळाले. सूत्रसंचालन मानसी गेडाम यांनी केले व आभार श्रुतिका सोनटक्के यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशासाठी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. एन. आर. झाडे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. धनंजय यादव, डॉ. भगवान धोटे, डॉ. मीरा वाघमारे, प्रा. कृणाल अंबोरकर, प्रा. नितेश सावसाकडे, प्रा. दगडू पांडुरंग गुडधे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 टिप्पण्या
Thanks for reading