✅
ग्रामपंचायत विक्रमपूरमध्ये गावविकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार?
सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर ग्रामस्थांचे गंभीर आरोप
✍️ सुखसागर एम. झाडे, चामोर्शी
चामोर्शी (गडचिरोली) :
ग्रामपंचायत विक्रमपूर येथे गावविकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप ग्रामस्थांनी ग्रामसभेत केले आहेत.
15 ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत 15 व्या वित्त आयोगानुसार मंजूर कामांचा आढावा घेतला असता, प्रत्यक्ष काम न करता फक्त कागदोपत्री दाखले दाखवून लाखो रुपयांची अफरातफर केल्याचे उघड झाले.
याबाबत ग्रामस्थांनी स्पष्ट आरोप करताना सांगितले की, सरपंच सरकार, ग्रामपंचायत अधिकारी बर्डे आणि कर्मचारी यांनी संगनमत करून गावातील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.
ग्रामपंचायत विक्रमपूर हे बंगाली समाज बांधवांचे गाव असून, केंद्र व राज्य सरकारकडून वार्षिक लाखो रुपयांचा निधी मिळत असतानाही गाव विकासापासून वंचित आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून विकास कामांचा ठसा दिसून आलेला नाही.
ग्रामस्थांच्या मते, ब्लीचिंग पावडर खरेदी, सॅनिटरी पॅड, पाईपलाईन, झाडे तोडणे, मुरूम टाकणे, कौशल्य विकास प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, सोलर हायमास्ट बसवणे, डस्टबिन, वॉटर एटीएम, मोबाईलद्वारे नळ योजना, पाणीपुरवठा योजना तसेच 26 जानेवारी सांस्कृतिक कार्यक्रम आदी योजनांवर खर्च दाखवून प्रत्यक्षात कोणतेही काम न करता मोठ्या प्रमाणात अफरातफर करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी केलेल्या या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून अफरातफर केलेली रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधितांवर भांदवी कलमान्वये दंडात्मक गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडली.
👉 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading