नांदगाव ग्रामपंचायतीत सागर देऊरकर यांची सरपंच पदावर पुन्हा नियुक्ती
✍️ प्रतिनिधी – वैनगंगा न्यूज लाईव्ह
मुल तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या नांदगाव ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा सत्तासमीकरणात मोठा बदल घडला आहे. सरपंच पदावरून हिमानी वाकुडकर यांची अपात्रता ठरल्याने उपसरपंच सागर देऊळकर यांच्याकडे सरपंच पदाची धुरा कायमस्वरूपी सोपविण्यात आली आहे.
नांदगाव ग्रामपंचायतीत मागील काही महिन्यांपासून स्थानिक राजकारणात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला तत्कालीन सरपंच हिमानी वाकुडकर यांना विविध कारणास्तव अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर उपसरपंच सागर देऊळकर यांच्याकडे प्रभारी सरपंच म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
दरम्यान, हिमानी वाकुडकर यांनी न्यायालयीन लढाई लढत पुन्हा एकदा सरपंच पदावर पुनरागमन केले. परंतु विरोधकांनी सातत्याने त्यांच्यावर आक्षेप घेतले आणि कायदेशीर पातळीवर चाललेला ससेमिरा सुरूच राहिला. अखेरीस पुन्हा एकदा त्यांची अपात्रता ठरविण्यात आली.
यामुळे उपसरपंच असलेले सागर देऊळकर यांची प्रभारी सरपंच पदावरून कायमस्वरूपी सरपंच पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून गावकऱ्यांच्या अपेक्षा आता नव्या सरपंचांकडे लागल्या आहेत.
नांदगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सरपंच बदलाच्या नाट्यमय घडामोडींमुळे गावातील राजकारण ढवळून निघाले आहे. सागर देऊळकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचे कारभार सुरळीत व विकासाभिमुख होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
👉
0 टिप्पण्या
Thanks for reading