“अरण्य” या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे गडचिरोलीत पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते अनावरण
✍️सुखसागर एम. झाडे.
गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारा आणि माओवादी चळवळीच्या वास्तवाचा वेध घेणारा “अरण्य” या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडले. या अनावरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल उपस्थित होते. त्यांच्या हस्ते लेखक व दिग्दर्शक श्री. अमोल दिगांबर करंबे यांच्या “अरण्य” या चित्रपटाचे पोस्टर अनावरण झाले.
चित्रपटाची पार्श्वभूमी
“अरण्य” हा चित्रपट गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील भागातील वास्तव उलगडून दाखवतो. माओवादी चळवळीची दहशत, आदिवासी समाजातील सामान्य नागरिकांचे जीवन, माओवादी विचारसरणीत अडकलेल्या युवकाचा प्रवास व आत्मसमर्पणानंतरचे बदललेले आयुष्य या सर्व गोष्टींवर हा चित्रपट प्रकाश टाकतो. केवळ काल्पनिक कथा नसून, पोलिस प्रशासन व नक्षलवादी यांच्यातील वास्तव संघर्ष, तसेच आदिवासी भागातील जीवनाची खरी झलक दाखविण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या अनावरण कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., तसेच लेखक–दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे उपस्थित होते. निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील यांच्यासह चित्रपटाशी निगडित अनेक मान्यवर या प्रसंगी हजर होते.
कलाकार व निर्मिती
या चित्रपटात अभिनेते हार्दिक जोशी, हृतिका पाटील, चेतन चावडा, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम यांसारख्या नामांकित कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेतून गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव समाजजीवनाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
प्रदर्शित होण्याची तारीख
“अरण्य” हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार असून, समाजातील वास्तव समस्यांवर भाष्य करणारा आणि परिवर्तनाचा संदेश देणारा असा हा चित्रपट ठरणार आहे.
👉 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading