Advertisement

🚨 सूरजागडच्या वाहनांकडून राष्ट्रीय महामार्ग ‘हायजॅक’ 🚛 रस्त्याच्या दुतर्फा ट्रकांची अवैध पार्किंग; नागरिक त्रस्त




🚨 सूरजागडच्या वाहनांकडून राष्ट्रीय महामार्ग ‘हायजॅक’ 🚛
रस्त्याच्या दुतर्फा ट्रकांची अवैध पार्किंग; नागरिक त्रस्त

✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

गोंडपिपरी (बामणी) :- दहेली, कळमना, येनबोडी, आमडी, वांढरेवाडी व कोठारी गावादरम्यान राष्ट्रीय महामार्ग ३५३ (बी) हा सूरजागड खाण प्रकल्पाच्या अवजड वाहनांनी अक्षरशः ‘हायजॅक’ केला आहे. दिवसरात्र ट्रक रस्त्याच्या दुतर्फा उभे करून वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होत आहे. पोलीस प्रशासन व परिवहन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ट्रॅक मालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत आहे.

या महामार्गावरून सूरजागड प्रकल्पाची ट्रक वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून ती आता नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. कोठारी ते बल्लारपूर (बामणी) दरम्यान दाट वस्ती, शाळा, महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना रोज अपार त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत "नो एंट्री" लागू करण्याची मागणी केली आहे.

महामार्ग गावाच्या मध्यवर्ती भागातून जात असल्याने महिला, मुले व शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ट्रक चालकांचा बेफाम वेग, वाहतूक नियंत्रणाचा अभाव, रस्त्याच्या दुतर्फा अवैध पार्किंग यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक चालकांकडे वाहन परवाने, आरटीओ तपासणी अहवाल अथवा शारीरिक दक्षतेची खात्रीही नसते. त्यामुळे नियंत्रण सुटून अपघात झाल्यास निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत. मागील दोन वर्षांत या मार्गावर अनेकांनी जीव गमावला आहे.

या गंभीर प्रश्नावर जिल्हाधिकारी व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ लक्ष घालावे, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे. नियमबाह्य ट्रक उभे राहिल्याने वाहतूक ठप्प होते; इतकेच नव्हे तर रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणेलाही मोठा अडथळा निर्माण होतो. पोलीस यंत्रणा केवळ कागदोपत्री आदेश काढून जबाबदारी झटकते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.


👉 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या