प्रतिनिधी: दरारा 24 तास न्युज नेटवर्क
बल्लारपूर पोलिस हद्दीतील बामणी येथील भागीरथी नाल्याजवळील एका वर्कशॉपमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण घटना उघडकीस आली. वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या चौकीदाराचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव मारोती मुकीनंदा कोठारकर (वय ६०, रा. बामणी हेटी) असे असून तो अनेक वर्षे चौकीदार म्हणून काम करीत होता.
सकाळी वर्कशॉप मालक कामावर पोहोचल्यावर त्यांना हा प्रकार दिसून आला आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरवैद्यकीय तपासणीसाठी चंद्रपूरला पाठविला.
प्राथमिक तपासानुसार, मृतक रात्री वर्कशॉपमध्ये शेकोटीजवळ बसला होता. मात्र, शेकोटीतील लाकडांची मात्रा कमी असून मानवी शरीर जळण्याइतकी नव्हती. मृतकाची चप्पल पायातच होती. त्यामुळे हा अपघाती मृत्यू की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व तपास जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या. न्यायवैद्यकीय पथकालाही तपासासाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading