Advertisement

पोंभुर्णा तालुक्यात महसूल पंधरवड्याचा प्रारंभ : ग्रामीण रस्त्यांचे सिमांकन व क्रमांक देण्याची मोहिम सुरू

 

📰 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क


पोंभुर्णा तालुक्यात महसूल पंधरवड्याचा प्रारंभ : ग्रामीण रस्त्यांचे सिमांकन व क्रमांक देण्याची मोहिम सुरू

पोंभुर्णा (दि. ११ सप्टेंबर) :
महसूल विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत पोंभुर्णा तालुक्यात आजपासून महसूल पंधरवडा उपक्रमाला सुरुवात झाली आहे. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांचे सिमांकन, नकाशावर अचूक नोंदी व प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक देण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

या उपक्रमाचा प्रारंभ आज (११ सप्टेंबर) शिवार फेरीपासून झाला असून, गाव शिवारातील पायमार्ग, गाडीमार्ग, शेतावर जाणारे रस्ते तसेच हद्दीचे रस्ते याबाबत माहिती संकलनाचे काम सुरू आहे. ही प्राथमिक माहिती संकलित करून ग्रामसभेत मांडण्यात येणार असून, ग्रामठरावासह यादी तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात येईल.

उपक्रमाचे प्रमुख मुद्दे :

  • गावनिहाय रस्त्यांची यादी तयार करणे
  • अतिक्रमित रस्त्यांबाबत प्रस्ताव सादर करणे
  • नकाशावर अचूक सिमांकन करणे
  • अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी पुढील कार्यवाही करणे
  • प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक देऊन अधिकृत नोंद ठेवणे

महत्त्वाच्या तारीखा :

  • ११ ते १२ सप्टेंबर : शिवार फेरी व प्राथमिक यादी तयार करणे
  • १३ ते १४ सप्टेंबर : शिवार फेरीसाठी राखीव दिवस

सहभाग आवश्यक :
या उपक्रमात तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, सर्वेअर, पोलिस पाटील यांच्यासह गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. शिवार फेरीदरम्यान अचूक माहिती देणे, ग्रामसभेत हजेरी लावणे व प्रशासनास सहकार्य करणे ही ग्रामस्थांची जबाबदारी असल्याचे तहसील प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ग्रामस्थांसाठी लाभ :
या उपक्रमामुळे गावातील रस्त्यांचे नकाशीकरण व्यवस्थित होईल, विकासकामांसाठी आवश्यक माहिती सहज उपलब्ध होईल तसेच अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचे निराकरण होईल. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करून गावाच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन तहसीलदार पोंभुर्णा यांच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या