दरारा 24 तास न्यूज नेटवर्क :
पोंभुर्णा तालुक्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार – युवा सेनेचा संताप, प्रशासनाला इशारा
✍️ प्रतिनिधी
पोंभुर्णा : पोंभुर्णा शहर व तालुक्यात शासनमान्य सरकारी स्वस्त धान्य दुकानांतून मोठ्या प्रमाणावर धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप युवा सेनेने केला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतील गरीब व गरजू जनतेसाठी असलेले धान्य खासगी व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर विकले जात असून, हे धान्य ट्रकद्वारे जिल्ह्याबाहेरही पाठवले जात असल्याचा आरोप युवासेना शहरप्रमुख महेश प्रकाश श्रीगिरीवार यांनी तहसीलदार यांचेकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.
श्रीगिरीवार यांनी सांगितले की, "सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांनी दलाल व व्यापाऱ्यांच्या संगनमताने हा मोठा घोटाळा रचला आहे. त्यामुळे हजारो कुटुंबे स्वस्त धान्यापासून वंचित राहत असून, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजनेला धक्का बसत आहे. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे."
मागण्या पुढे केल्या
युवासेनेने प्रशासनाकडे पुढील ठोस मागण्या केल्या आहेत –
- धान्य घोटाळ्यातील दोषी दुकानदार, व्यापारी व संबंधित लाभार्थ्यांवर कठोर कारवाई करावी.
- दुकाने व गोडावूनची चौकशी करून साठवलेले धान्य जप्त करावे.
- धान्य वाहून नेणारे ट्रक व वाहनांवर कारवाई करून त्यातील माल जप्त करावा.
- या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी.
दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
युवासेनेने प्रशासनाला इशारा देत सांगितले की, जर सात दिवसांच्या आत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, तर युवासेना पोंभुर्णा तर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.
महेश श्रीगिरीवार म्हणाले, “गरीब आणि सामान्य जनतेच्या हक्काचे धान्य लुटणाऱ्या भ्रष्ट यंत्रणेचा आम्ही कडाडून विरोध करू. पोटभर अन्न मिळणे हा जनतेचा हक्क असून, त्या हक्कासाठी युवा सेना रस्त्यावर लढा देईल.”
या वेळी निवेदन देताना युवासेना शहरप्रमुख महेश श्रीगिरीवार यांच्यासोबत कृषभ बुरांडे, सुरज कावळे तसेच इतर युवासेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉
0 टिप्पण्या
Thanks for reading