👍 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
गणेश उत्सवानिमित्त वेळव्यात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन
१९७ नागरिकांनी घेतले आरोग्य तपासणीचे लाभ
पोंभूर्णा (प्रतिनिधी) – तालुक्यातील वेळवा येथे हनुमान गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सध्या तालुक्यात टायफॉईड, डेंग्यू, मलेरिया व व्हायरल फिव्हरची साथ पसरत असल्याने गावात रोगराई आटोक्यात राहावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात तब्बल १९७ नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी करून घेतली.
गेल्या काही दिवसांत ग्रामीण रुग्णालयात ताप, सर्दी, खोकला व टायफॉईडचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दक्षता घेण्याच्या उद्देशाने हे शिबिर भरविण्यात आले.
विविध तपासण्या करून नागरिकांचा दिलासा
या शिबिरात बी.पी., शुगर, सीबीसी, मलेरिया, डेंग्यू, टायफॉईड, सिकलसेल अशा अनेक आजारांची तपासणी करण्यात आली. एकूण १९७ नागरिकांची तपासणी झाली, त्यापैकी ४३ नागरिकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला.
शिवसेना व गणेश मंडळाचा पुढाकार
आरोग्य शिबिराचे आयोजन शिवसेना तालुका अध्यक्ष पंकज वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली, वेळवा येथील हनुमान गणेश मंडळ व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. हनुमान गणेश मंडळातील सदस्य व महिलांनीही शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित
शिबिरात डॉ. संदेश मामिडवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणय भगत, सामुदायिक आरोग्य अधिकारी प्रियंका इसलवार, आरोग्य अधिकारी अमिता जंगले यांच्यासह अनेक आरोग्य कर्मचारी व सहाय्यक उपस्थित होते. आरोग्य सेवक, आशा वर्कर्स, तसेच स्थानिक तरुणांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे गावकऱ्यांना तातडीने तपासणी व योग्य सल्ला मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
👉
0 टिप्पण्या
Thanks for reading