दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा तालुक्यातील अर्थसाहाय्य निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा : अल्का आत्राम यांची मागणी
पोंभुर्णा (प्रतिनिधी):
पोंभुर्णा तालुक्यातील अनेक दारिद्र्य रेषेखालील महिलांना गेल्या दोन वर्षांपासून अर्थसाहाय्य निधी अभावी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः ज्या महिलांनी अल्पवयात पती गमावला आहे, त्यांना संसाराचा भार उचलताना असंख्य संकटांना सामोरे जावे लागत आहे. शासनाने अशा गरीब आणि वंचित घटकांसाठी “अठराविश्व दारिद्र्य निर्मूलन” या योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य निधीचा लाभ देण्याची तरतूद केली असली तरी निधीअभावी मंजूर प्रकरणे रखडली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अशा ४० मंजूर केसेस सध्या निधीअभावी थांबलेल्या आहेत. तसेच नवीन ४० लाभार्थ्यांची नोंदणी देखील झाली असून त्यांना मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. निधी उपलब्ध नसल्याने हे लाभार्थी वारंवार तहसील कार्यालयाचे फेरे मारत आहेत. मंजुरी मिळाल्याची खात्री असूनही आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने अनेकांना निराशा जाणवत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्या अल्का आत्राम यांनी या विषयाची माहिती थेट विधानसभेचे आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दिली. प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन आमदार मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यासाठी निर्देश दिले. तसेच राज्य शासनाच्या पातळीवरूनही या निधीच्या मंजुरीसाठी पुढाकार घेतला आहे.
अल्का आत्राम यांनी सांगितले की, “दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी शासनाच्या योजना कागदावरच राहू नयेत. मंजूर लाभार्थ्यांना तातडीने निधी मिळणे आवश्यक आहे. मी या विषयावर सतत पाठपुरावा करत असून आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून लवकरच निधी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.”
गरजू, विधवा आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांच्या हितासाठी अल्का आत्राम यांनी घेतलेला पुढाकार आणि आमदार मुनगंटीवार यांनी दाखवलेली तत्परता यामुळे लवकरच तालुक्यातील लाभार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा प्रतिनिधी


 



 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
0 टिप्पण्या
Thanks for reading