Advertisement

जूनगावच्या माजी सरपंच सौ. इंदिराताई नागापुरे यांना पुत्रशोक एकुलत्या एक मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर — गावात हळहळ

 


जूनगावच्या माजी सरपंच सौ. इंदिराताई नागापुरे यांना पुत्रशोक
एकुलत्या एक मुलाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर — गावात हळहळ

पोंभुर्णा तालुका (प्रतिनिधी):
जूनगाव (ता. पोंभुर्णा) येथील माजी सरपंच सौ. इंदिराताई सुखदेव नागापुरे यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे एकुलते एक सुपुत्र निखिल नागापुरे (वय अंदाजे ३० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. निखिलच्या जाण्याने नागापुरे कुटुंबासह संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे.

दोन-तीन वर्षांपूर्वीच निखिलच्या पत्नीचेही दुर्दैवी निधन झाले होते. त्या वेळीच लहानशी एक कन्या मागे ठेवून त्या या जगाचा निरोप घेतल्या होत्या. आता निखिलच्या अकाली जाण्याने त्या लहान मुलीच्या डोळ्यांतील पित्याचे सावलीही हरपली आहे. या दुःखद घटनेने गावकऱ्यांच्या मनात हळहळ निर्माण झाली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

निखिल हा स्वभावाने अत्यंत मनमिळावू, सर्वांशी आपुलकीने वागणारा, तरुण पिढीला प्रेरणा देणारा असा युवक म्हणून गावात परिचित होता. सामाजिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक उपक्रमात त्याचा नेहमी सहभाग असायचा. त्याच्या अकाली जाण्याने एक उमदा, हसरा चेहरा कायमचा हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

नागापुरे परिवाराने आपल्या सार्वजनिक कार्यातून गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. इंदिराताई नागापुरे यांनी माजी सरपंच म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली असून समाजात त्यांना विशेष आदराचे स्थान आहे. मात्र आता त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.

अंत्यसंस्कार सोमवारी जूनगाव येथे मोठ्या शोकाकुल वातावरणात पार पडणार आहे. शेवटचा निरोप देण्यासाठी परिसरातील शेकडो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत.

गावकऱ्यांनी व्यक्त केलेली भावना अशी — “निखिल हा गावाचा आत्मा होता; त्याचं हास्य, त्याची आपुलकी आणि माणुसकीची ओढ आम्ही कधीही विसरू शकणार नाही.”

🙏 वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क तर्फे नागापुरे परिवाराला भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या