✍️ पोंभुर्णा : दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
वेलवा येथे बिरसा मुंडा पुतळा उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा भव्य उत्साहात संपन्न
पोंभुर्णा तालुक्यातील वेलवा (वेळवा) येथे महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि जननायक धर्ती आबा बिरसा मुंडा यांच्या पुतळा उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा दि. २ ऑक्टोबर रोजी मोठ्या जल्लोषात पार पडला. गावकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याने सामाजिक एकतेचा आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर मिलाफ अनुभवास आला.
या पवित्र कार्यासाठी लागणारी जमीन श्री. लक्ष्मण कुंबरे यांनी आपल्या मातोश्री स्व. गोदुबाई मारोती कुंबरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दान करून एक आदर्श घालून दिला. त्यांच्या या उदात्त कार्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली.
सोहळ्याची सुरुवात पारंपरिक पद्धतीने निसर्ग व पेन पूजनाने करण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात गावातून निघालेल्या भव्य मिरवणुकीने वातावरण भारावून गेले. परिसर पिवळ्या-भगव्या झेंड्यांनी सजविण्यात आला होता, तर महिला-पुरुष, युवक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रसंगी प्रा. डॉ. विठ्ठल आत्राम यांनी मार्गदर्शनपर भाषणातून समाजाला प्रेरणा दिली. ते म्हणाले, “बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या स्वाभिमान आणि हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या कार्याचे स्मरण करून समाजासाठी कार्य करणे हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे.”
कार्यक्रमास दलित पंथर चे जिल्हा प्रमुख रुपेश निमसरकार, महेश मेश्राम, लालाजी कुभरे, रामचंद्र कुभरे, अनिल आत्राम, हिरामण आत्राम, मधुकर मेश्राम यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांचा, युवकांचा, बालकांचा आणि ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याने हा सोहळा सर्व घटकांच्या एकत्रित सहभागाने ऐतिहासिक ठरला.
धर्ती आबा बिरसा मुंडा यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात येणारा हा पुतळा केवळ एक स्मारक नसून, तो आगामी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. आदिवासी समाजाच्या इतिहासातील संघर्ष, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सर्व उपस्थितांनी मत व्यक्त केले.
📍 रिपोर्ट : दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
🗓️ २ ऑक्टोबर २०२५, वेलवा (पोंभुर्णा)




0 टिप्पण्या
Thanks for reading